यांत्रिकीकरणामुळे जग जवळ आले, परंतू माणूस दुरावत चालला आहे. मोबाईलमुळे दुरवरची माणसे जवळ दिसू लागली. परंतू शेजारी बसलेल्या माणसाला बोलण्यासाठी वेळच राहिला नाही. माणूस माणसाला विसरत चाललेला असताना अशा परिस्थितीत सुद्धा, फक्त गावाकडची ओढ आणि नोकरी व उद्योग व्यवसायामळे दुरावलेली मायेची ती माणसे परत आपलेसे करण्यासाठी, पुणे येथून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने समाजसेवेचा तसेच वडीलांच्या आठवणींचा वसा घेऊन, सातत्याने गावाकडे कोणता तरी उद्देश घेऊन, झरे गावात येणारा ध्येयवेडा व्यक्ती म्हणजे सुनिल (कोळी) बळवंत....
आज समाजामध्ये कुणासाठी एक रुपया खर्च करावयाचा म्हटले तरी हजार वेळेस विचार केला जातो. परंतू फक्त गावाकडच्या माणसांची नाळ आणि वयोवृद्धांचा आशिर्वाद मिळावा. यासाठी स्वखर्चातून विविध उपक्रम राबविणारे, आदर्श शिक्षक तालुका मास्तर स्व. कोळी गुरुजी यांचे सुपुत्र, सुनील (कोळी) बळवंत यांनी सुद्धा, वडिलांच्याच पावलावर-पाऊल ठेवत समाजसेवेचा वसा घेतलेला आपल्याला दिसून येतो. दरवर्षीच गणेश चतुर्थीच्या माध्यमातून ते समाजसेवा करत असतात. यावर्षी देखील झरे गावात शेकडो मोफत गणेश मुर्तींचे वाटप तसेच, गावातील माजी सैनिकांचा सत्कार व वयोवृद्ध व्यक्तींना काठीचा आधार, मायेची शाल आणि उबदार पांघरून देऊन त्यांचा सन्मान केला. त्याचप्रमाणे वयोवृद्ध महिलांना देखील या सदरच्या वस्तू दिल्या गेल्या. व आस्थेने प्रकृतीची विचारपूस केली.
आज माणसांकडे मोठ-मोठी वाहने आली, परंतू माणसाजवळ थांबण्यास वेळ नाही. परंतू आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. त्यामुळे सुनिल (कोळी) बळवंत यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे गाव सोडून नोकरी, व्यवसाय करण्यासाठी बाहेर गेलेल्या अनेकांसाठी एक आदर्श म्हणून नक्कीच समोर राहतील. यात काही शंकाच नाही.
लेखन- सोमनाथ जाधव, झरे ग्रामस्थ






Post a Comment