करमाळा तालुका अंतर्गत दि. 9 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र केम व 10 मे रोजी उपजिल्हा रुग्णालय करमाळा, येथे सकाळी 10 वा. कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, तालुक्यातील सर्व रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर यांनी केले आहे. यावेळी या शिबिरासाठी करमाळा तालुक्याचे आ. नारायण पाटील, उपसंचालक पुणे मंडळ पुणे, डॉ. राधाकिसन पवार, सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी नवले तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ, श्रीकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, त्यांच्या प्रयत्नातून कर्करोग तपासणी व्हॅन, उपजिल्हा रुग्णालय करमाळा व केम प्रा. आ. केंद्र येथे उपलब्ध होणार आहे.
यावेळी अधिक माहिती देताना डॉ. गुंजकर म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कर्करोगाचे वेळेत निदान करून उपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाचे निदान लवकरात-लवकर होणे आवश्यक आहे. कर्करोगामध्ये मुख, स्तन, तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. या शिबिरामध्ये तीन ही प्रकारच्या कर्करोगाची तपासणी व प्रयोगशाळा तपासणी होणार आहे. तरी कर्करोग निदान शिबिराचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय करमाळाचे डाॅ. गजानन गुंजकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. काटकर यांनी केले आहे.





Post a Comment