गतवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी सध्या 31.89 टक्क्यांवर आल्याने, आता उजनीची वाटचाल लवकरच वजा (मायनस) पातळीकडे सुरू होत असुन, अवघ्या अडीच ते पावणे तीन महिन्यात म्हणजे 80 दिवसात पाण्याचा सुपडासाफ झाल्याने पाण्याला नेमके पाय कुठे फुटतात? आणि एवढे पाणी जाते तरी कुठे? हेच धरणग्रस्तांना कळायला मार्ग नाही. अजून किमान चार महिने पाणी कसे पुरणार? त्यातच वाढत्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन ही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे हा देखील चिंतेचा विषय झाला आहे. सोलापुर जिल्ह्याला पिण्यास पाणी सोडले जाते असे सांगण्यात येत असले तरी, सोलापूरकरांची तहान आहे तरी केवढी? असा प्रश्न पडला आहे. पावसाळ्यात धरण भरल्यानंतर 117 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होतो. धरणाचा 63.65% एवढा सर्वात मोठा मृतसाठा आहे. तर 53.57 उपयुक्त साठा आहे. दरवर्षी फेब्रुवारी आसपास सोलापूरसाठी पाणी सोडण्यास सुरुवात होते. यंदा ही जानेवारी पर्यंत 100 टक्के पाणीसाठा होता. फेब्रुवारी, मार्च दरम्यान खाली पाणी सोडण्यात आले. शिवाय सीना-माढा, दहीगाव, मुख्य कॅनॉल यातून ही पाणी सोडण्यात आले आहे. दरवर्षी "उचकी पेक्षा गुळणी मोठी " असाच प्रकार समोर येत आहे. पाण्याचे नियोजन करण्यात शासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे मूळ धरणग्रस्तांना मात्र उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून ही संकटाला सामोरे जावे लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे.
111% झालेला पाणीसाठा उन्हाळ्यात 33.81% वर आला आहे. सोलापूरचे नदीद्वारे पाणी सोडण्याच्या पद्धतीमुळे केवळ 5 टीएमसी पाण्यासाठी 25 ते 30 टीएमसी पाण्याचा अनाठाई दरवर्षी अपव्यय होतो. त्यामुळे सोलापूरसाठी बंद पाईपलाईन मधून पाणी नेण्याचे काम सुरू आहे. ते काम लवकरात-लवकर होणे गरजेचे आहे. पुण्याच्या आयत्या पाण्यावर अवलंबून न राहता भीमा नदी पात्रात बुडीत बंधारे बांधण्याची गरज आता निर्माण झाली आहे. यासाठी राजकारणी मंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी केवळ आश्वासन देणे उपयोगाचे नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. साहजिकच आता 31.89 टक्क्यांवर पाणीसाठा आला आहे. पाण्याची गरज लक्ष्यात घेता येत्या काही दिवसात १४ टक्के पाणी संपणार आहे. व उजनीची वाटचाल वजा (मायनस) पातळीवर जाणार आहे. सहाजिकच पाणलोट क्षेत्रातील बळीराजाची धाकधूक वाढली आहे.
उन्हाळ्यात सर्वाधिक पाणी टंचाईच्या झळा करमाळा, इंदापुर, दौंड, कर्जत तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गावांना व शेतीला बसतात. उन्हाळा आता कुठे उग्र रूप धारण करू लागल्याने अस्तित्वात असलेल्या पाण्याचा वापर व होणारे बाष्पीभवन, तसेच भविष्यात पाण्याच्या भीषण टंचाईची घंटा आताचच वाजू लागली आहे. दरवर्षी उन्हाळ्यातील पाणीटंचाई काळीज पिळवटून टाकत असते. पाणलोट क्षेत्रात वाढीव जलवाहिनी टाकणे, वीज वायर लांबवणे, चाऱ्या खोदणे या बाबींमध्ये बळीराजा घामाघूम होतो. केवळ राजकीय हस्तक्षेप व नियोजनाअभावी हा धरणग्रस्त उन्हाळ्यात सुकून जात असला, तरी राजकारण्यांना व अधिकाऱ्यांना घाम फुटत नाही. हीच धरणग्रस्तांची गेल्या 50 वर्षातील मोठी शोकांतिका आहे. पाणी झपाट्याने रिकामे होत असल्याने उजनी फुगवट्यावर अवलंबून असलेल्या करमाळा, इंदापूर, कर्जत, दौंड तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीच्या तसेच पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. बागायती पिके ऐन उन्हाळ्यात संकटात आली आहेत. यामध्ये ऊस, केळी, फळबागांचा प्रामुख्याने समावेश आहे.





Post a Comment