Header Ads Widget

 


करमाळा-
              बागल गटाला राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सातत्याने, आतापर्यंत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष्य केले गेले आहे. पुन्हा असा प्रकार आदिनाथच्या बाबतीत होऊ नये, याकरता उद्याच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाने थांबण्याचा निर्णय घेतला असून, बागल गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज येत्या दोन दिवसात माघारी घ्यावेत. असे आवाहन बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांनी बागल संपर्क कार्यालयात केले. यावेळी मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व शिवसेना जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल उपस्थित होते. 

        बागल संपर्क कार्यालयात श्री आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाच्या वतीने ज्यांनी आपले फॉर्म भरले आहेत त्यांची विचार विनिमय बैठक संपन्न झाली. प्रारंभी लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या प्रतिमेचे पूजन सोमनाथ पोटे व अंगद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आदिनाथ निवडणूक संदर्भात विचार विनिमय करण्यात आले. मार्केट कमिटीचे माजी चेअरमन प्रा. शिवाजीराव बंडगर सर, आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, चिंतामणी जगताप, कल्याणराव सरडे सर, रणजीत शिंदे, अंगद पाटील ,केरू गव्हाणे, ॲड नानासाहेब शिंदे आदि सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी सर्वांनी एक मुखाने आदिनाथ निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार गटाच्या नेत्या व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांना प्रदान करण्यात आले. यावेळी मकाईचे माजी चेअरमन व शिवसेना युवा नेते दिग्विजय बागल यांनी आपल्या नेत्या रश्मी बागल व मार्गदर्शक घुमरे सर जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा असे आवाहन केले.

           यावेळी मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांनी बोलताना सांगितले कि, गेल्या वीस वर्षांमध्ये बागल गटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ कारखान्याला अडचणीत आणून बागल गटाला लक्ष्य केले गेले आहे. कुठेतरी बागल गटाला लक्ष करुन आदिनाथ चालु नये, व पुन्हा असा प्रकार होऊ नये. त्यासाठी आम्ही या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही फक्त निवडणुकीपुरतं थांबलो आहोत आदिनाथ व्यवस्थित चालण्यासाठी आमचे योगदान सातत्याने असेल, जो कोणी आदिनाथच्या सत्तेवर येईल त्याला बागल गटाच्या वतीने सर्व ते सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी घुमरे यांनी दिली. तसेच बागल गटाच्या सर्व फॉर्म भरलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज येत्या दोन दिवसांमध्ये तातडीने माघारी घ्यावेत. असे ही आवाहन शेवटी विलासराव घुमरे यांनी केले. यावेळी बागल गटाच्या वतीने फॉर्म भरलेले सर्व उमेदवार उपस्थित होते.


Post a Comment