येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव अॅड. संग्राम माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने हे होते. यावेळी उद्योजक नितीन दोशी, बळीराम माने, राजू शिंदे, रमेश शिंदे, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, महावीर शहा, लखन पवार आदींसह पालक उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवणारे खेळाडू कृष्णा भागवत, तसेच शालेय कुस्ती स्पर्धेत यश मिळवणारे प्रथमेश शिंदे यांचा शाळेच्या वतीने माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे पार पडली. तर शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनाची माहिती दिली. यावेळी कवायत प्रकार घेण्यात आले. देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण ही विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माने यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे समाजातील उपेक्षित घटक विकासाच्या प्रवाहात येण्यास मोठी मदत झाली असे सांगितले. यावेळी बोलताना अॅड. माने यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक भारतीयाने संविधानाचा सन्मान केला पाहिजे. संविधानामुळे माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार मिळाला आहे. स्वातंत्र्य मिळाले आहे. संविधानामुळेच समाजाची प्रगती होणार आहे. असे मत व्यक्त केले. याप्रसंगी पत्रकार वाघमारे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच शिक्षणामुळे विकास होतो. आश्रमशाळेमुळे शिक्षणाची मोठी संधी मिळाली आहे. असे स्पष्ट केले. यावेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता गोड जेवणाने करण्यात आली.






Post a Comment