Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
          शिव ,शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असून खुन, बलात्कार, छेडछाड, अपहरण सारख्या गंभीर प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे  पिडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर ही संबंधित आरोपींवर कठोर  कारवाई करण्यात येत नाही. जर सरकार अशा आरोपींना मोकाट सोडणार असेल, तर स्वसंरक्षणासाठी मुली असणाऱ्या पालकांना शस्त्र वापरण्याचे परवाने द्यावेत. असे आवाहन मांगी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.शीला अवचर यांनी केलेले आहे. 

             महाराष्ट्रातील महिला मुली असुरक्षित असून, शाळेत गेलेली मुलगी घरी येईपर्यंत मुलींचे पालक प्रचंड चिंतेत असतात. दिवसेंदिवस महिला व अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ होत असून, राज्याचे गृहमंत्री सुट्टीवर गेले की काय? असा संतप्त सवाल महिला वर्गातून होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी कठोर निर्णय घ्यायला हवा. जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसेल. गुन्हेगार मोकाट फिरणार नाहीत. अशा कित्येक घटना महिला, अल्पवयीन मुलीं सोबत घडत आहेत. ज्यामधील आरोपी मोकाट फिरत आहेत. काहींना पोक्सो ॲक्ट अंतर्गत शिक्षा होऊन देखील जामीन मिळत आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या इज्जतीच सरकारला काही ही घेणेदेणे राहिलेले नाही. असेच सध्याचे चित्र दिसून येत आहे. एखाद्या महिलेवर किंवा मुलीवर अन्याय होतो, ते पीडित कुटुंब न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यास त्यांना लाजिरवाणे प्रश्न विचारले जातात. आरोपी विरोधात लवकर गुन्हा दाखल केला जात नाही. महिला सुरक्षा संदर्भात देशातील कायदे कठोर असून ही कायद्याची अंमलबजावणी त्याप्रमाणे होत नाही. म्हणूनच असे गुन्हेगार मोकाट सुटून ते पुन्हा पुन्हा गुन्हे करताना दिसत आहेत. अशाप्रकारचा आरोप सौ. अवचर यांनी केला आहे.

        पुढे बोलताना सौ. अवचर म्हणाल्या कि, खरे तर अशा आरोपींचा जलद गती न्यायालयात खटला चालवुन यांना ताबडतोब फाशी द्यायला हवी. जर सरकारकडून अशा आरोपींवर कारवाई होत नसेल, तर आम्हा महिलांना किंवा मुलींच्या पालकांना शस्त्र वापरण्याचे परवाने द्यावे. जेणेकरून येणाऱ्या काळात आमची सुरक्षा आम्हीच करू. अशा प्रकारची मागणी सौ.शीला अवचर केली आहे.

Post a Comment