Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
              जेऊर ते कुगाव या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले गेले होते. सदरच्या रस्त्यामुळे अनेकांना पाठदुखी, मणक्याचे आजार त्याचप्रमाणे रस्त्यावरील धुळीतून श्वसनाचे आजार जडले गेले. परंतु राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विकासाच्या फक्त गप्पा मारत आ. संजयमामा शिंदे यांनी जनतेला आतापर्यंत वेड्यात काढण्याचे काम केले आहे. अशा प्रकारची टीका करमाळा पंचायत समितीचे मा. उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी केली आहे. 
            पुढे बोलताना सरडे म्हणाले की, जेऊर ते कुगाव यादरम्यान शेटफळ (ना.), चिखलठाण-१, चिखलठाण-२ त्याचप्रमाणे इतरही गावांचा या मार्गावर समावेश होतो. परंतु आत्तापर्यंतच्या आ. संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळातून या रस्त्याकडे पूर्णतः डोळेझाक झाल्याचे दिसून आले आहे. आ. शिंदे यांच्या गटाचा चिखलठाण ग्रामपंचायतीवर ही ताबा होता. परंतु सरपंच व आमदाराच्या नुस्त्या विकासाच्या गप्पा, यामुळे चिखलठाणच्या ग्रामस्थांनी सुद्धा ग्रामपंचायत मधून आमदार शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व हाणून पाडले. लोकसभेच्या प्रचारादरम्यान आमदार शिंदे व माजी खासदार निंबाळकर यांचा ताफा चिखलठाण ग्रामस्थांनी सभेच्या वेळेस अडवला होता. त्यावेळेस ही दोघांनी फक्त जनतेतून पळ काढण्यासाठी आश्वासन देऊन निघून गेले. परंतु रस्त्याचे काम काही झाले नाही. आत्ता विधानसभेच्या निवडणुका दोन ते तीन महिने राहिल्या असल्यामुळे, व जनतेतून जेऊर ते कुगाव या रस्त्या संदर्भात रास्ता रोको, आमरण उपोषण व प्रशासकीय पातळीवर जनतेतुन रोष निर्माण होत असल्याचे पाहून, व विधानसभेच्या तोंडावर जनतेच्या मतांचा गट्टा मिळवण्यासाठी, "आता मी राजकारण करत नाही फक्त विकासावरच बोलतो. व जे काम होत आहे ते केल्याशिवाय गप्प बसत नाही." अशा प्रकारच्या वायफळ गप्पा आमदार शिंदे हे मारताना दिसून येत आहेत. 

           जर जेऊर ते कुगाव दरम्यानच्या रस्त्याचे काम पंधरा दिवसात होत असेल, तर त्यासाठी कोरोना कालावधी वगळता उर्वरित दोन वर्षांमध्ये सदरच्या रस्त्याचे काम का झाले नाही? त्याला निवडणुकीच्या आधीचाच काळ का यावा लागला? जनतेच्या मुलभुत सोयीसुविधांसाठी सुद्धा इथून पुढे अशाच प्रकारे आंदोलने करावी लागतील का? असाही प्रतिप्रश्न सरडे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे आता आ. शिंदे यांच्या भुलथापांना जनता बळी न पडता, फक्त मा. आ. नारायण पाटील यांच्या कार्यकुशलते बरोबर सदैव राहणार आहे. व आमदार संजयमामा शिंदे यांनी विकासाच्या नावाखाली राजकारण करत जनतेला वेड्यात काढू नये. अशा प्रकारची घणाघाती टीका सरडे यांनी केली आहे.

Post a Comment