सध्याच्या आधुनिक युगामध्ये चोरी करण्याचे नवनवीन प्रकार चोरांकडून दिसून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सध्या अनेक ठिकाणी ड्रोन फिरत असलेले निदर्शनात आलेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, समाज माध्यमातून उलट सुलट चर्चा सुरू आहेत. याच अनुषंगाने काल रात्री हे संबंधित ड्रोन करमाळा तालुक्यातील मांगी, खांबेवाडी, हिवरवाडी, दिलमेश्वर परिसरात दिसून आलेले आहेत. व यासंबंधी ग्रामस्थ व नागरिकांनी संघर्ष न्यूजशी बोलताना याविषयी दुजोरा दिलेला आहे. वरील गावांवरती संध्याकाळच्या वेळी घिरट्या घालणारे ४-५ ड्रोन ग्रामस्थांच्या नजरेस आलेले आहेत. सदरचे ड्रोन गावचे पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुण व अबालवृद्धांनी पाहिलेले आहेत. या संपुर्ण प्रकाराची माहिती देण्यासाठी संघर्ष न्यूजचे प्रतिनिधी प्रविणकुमार अवचर यांनी करमाळा पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस निरिक्षक घुगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे अवचर यांनी माहिती दिली आहे. मांगी गावाच्या वरती चार ड्रोन सतत घिरट्या घालत होते. यासंबंधी करमाळा पोलीस स्टेशन येथे संपुर्ण माहिती दिली आहे. सदरचा प्रकार नेमका काय आहे? यासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे रोडगे साहेब आले होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सतर्क राहुन दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
आकाश शिंदे (पोलीस पाटील, मांगी गाव)
सुरुवातीला दिलमेश्वर गावावरती रात्री तीन ड्रोन ९ वा. ते ९.१५ वा. दरम्यान घिरट्या घालत होते. यानंतर रात्री ११ वा. पर्यंत चार ड्रोन गावावरती घिरट्या घालत होते. यावेळी अनेक नागरिकांनी घराच्या छतांवरती चढून, ड्रोनला लगोर व दगडाच्या सहाय्याने खाली पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित ड्रोन उंचावर उडत असल्यामुळे सर्वांचा प्रयत्न अपयशी झाला. गावावरती फिरणाऱ्या ड्रोन संबंधी करमाळा पोलीसांना वेळीच माहिती देणार आहे.प्रकाश राक्षे (पोलीस पाटील, दिलमेश्वर)





Post a Comment