करमाळा-
माढा लोकसभेचे खा. धैर्यशील मोहीते-पाटील यांना आज अकलूज येथे, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जेऊर-चौंडी-आष्टी रेल्वे मार्गास निधी उपलब्ध करून, प्रत्यक्षात काम चालू करण्याचे व जेऊर रेल्वे स्थानकांवर हुतात्मा (12157-58) तसेच उद्यान एक्सप्रेस (11301-02) या दोन गाड्यांना कायमस्वरूपी थांबा देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, पोथरे गावचे सरपंच अंकुश शिंदे, अंजनडोहचे मा. सरपंच शहाजी माने, डॉ. अशोक शेळके, सरपंच अरूण शेळके, विहाळ चे सरपंच मोहन मारकड इत्यादींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी जेऊर रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, उपाध्यक्ष प्रवीण करे यांच्या सहीचे देखील पत्र देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, जेऊर-आष्टी रेल्वे मार्गाचा फायनल सर्वे पूर्ण झालेला असून, 2023 ते 24 वर्षां करीता 1000 हजार रुपयेचा निधी देण्यात आला आहे. जेऊर ते आष्टी रेल्वे मार्ग हा 78 किलोमीटर अंतराचा असून, शासन स्तरावरून नव्याने रेल्वे सुधारीत मार्गासाठी नियोजित निधी 1560 कोटी रुपयेची तरतूद केली आहे. तरी तो मार्ग निधी अभावी प्रलंबित आहे. आपण आपल्या वरिष्ठ पातळीवर शासन दरबारी पाठपुरावा करून तात्काळ निधीसाठी प्रयत्न करावा. जेऊर ते आष्टी रेल्वे मार्गाचे काम झाल्यास जेऊर, करमाळा, चौंडी, आष्टी या शहरांना दळणवळणासह रेल्वे स्थानकास विशेष महत्त्व प्राप्त होईल. तसेच करमाळा येथील कमलाभवानी मंदिरास व चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मतीर्थ चौंडींला विशेष महत्त्व प्राप्त होऊन पर्यटनाला मदत होईल. त्याचप्रमाणे दक्षिण भारताकडून येणाऱ्या व उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना जेऊर येथे विशेष थांबा मिळेल. करमाळा, कर्जत, जामखेड, परांडा तालुक्यातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील विकासाला व आर्थिक परिस्थितीला चालना मिळण्यासाठी जेऊर-चौंडी ते आष्टी या रेल्वे मार्गामुळे जेऊर स्थानकांस जंक्शनचा दर्जा मिळेल. आणि सर्व रेल्वे गाड्यांना भविष्यात थांबा मिळेल. त्यामुळे जेऊर शहर हे दळणवळणासाठी फार उपयोगी ठरणार आहे. या अनुषंगाने जेऊर-चौंडी-आष्टी हा रेल्वेमार्ग लवकरात-लवकर पूर्ण करण्याचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माढा लोकसभेचे खा. धैर्यशील मोहीते-पाटील यांना देण्यात आले आहे.




Post a Comment