करमाळा तालुक्यातील कावळवाडी या गावामध्ये श्री संत बाळूमामा यांच्या बगा नं. १५ या पालखीचे आगमन झाल्यामुळे, गावात तसेच आसपासच्या पंचक्रोशीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदरच्या पालखीचे शुक्रवार दि. २२ मार्च २०२४ रोजी आगमन झाले आहे. या पालखीच्या स्वागतासाठी कावळवाडी व आसपासच्या गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. श्री संत बाळूमामांच्या पालखी आगमनानिमित्त गावामध्ये दररोज किर्तन सोहळा राबविण्यात येत आहे. यामध्ये १) हभप विकास महाराज देवडे २) हभप योगिताताई डोंबाळे ३) हभप गोरक्षनाथ उकले ४) हभप विनोद महाराज रोकडे ५) हभप प्रांजलीदिदी हाके यांनी अनुक्रमे सलग पाच दिवस सुश्राव्य अशी किर्तन सेवा बजावली आहे. यामध्ये हभप प्रांजलीदिदी हाके हि कावळवाडी गावची कन्या असुन, ती सध्या आळंदी येथे प्रशिक्षण घेत आहे. श्री संत बाळूमामांच्या पालखी आगमनानिमित्त प्रांजलीदिदी हाके हिचे किर्तन ठेवल्यामुळे, गावची कन्या कशाप्रकारे किर्तन करते. हे पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी गावातील व पंचक्रोशीतील अबालवृध्द, तरुण, महिला, मुली यांनी मोठ्या प्रमाणात किर्तनासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी हभप प्रांजलीदिदी हाके यांनी त्यांच्या किर्तनातुन संत तुकाराम महाराज, संत बाळूमामा, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर किर्तनातुन अचुक असे भाष्य केले. सदरचे किर्तन तब्बल दोन तास सुरु होते. सदरच्या सुश्राव्य किर्तनाचे संपुर्ण गावामध्ये कौतुक केले जात आहे. तर पुढील भविष्यकाळामध्ये प्रांजलीदिदीने कावळवाडी गावाचे नाव अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये उंचावर घेऊन जावे. अशाप्रकारच्या शुभेच्छा यावेळी गावकऱ्यांच्या वतीने प्रांजलीदिदीला देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण किर्तनानंतर श्री संत बाळूमामांची आरती करुन, उपस्थित सर्व गावकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री संत बाळूमामांच्या करुणेचा, कार्याचा तसेच त्यांच्या कृपाशिर्वादाचा महिमा सर्व भक्तांना माहित आहे. व अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. प्राणीमात्रावर दया करा, संत बाळूमामांच्या या शिकवणीतुन जो भक्त, श्री संत बाळूमामांच्या मेंढ्याची सेवा करतो. त्याला बाळूमामांचा कृपाशिर्वाद नक्कीच मिळतो.
राहुलदादा वाघमोडे, कारभारी बगा क्र. १५





Post a Comment