करमाळा नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील साफसफाई स्वच्छता करणारा ठेकेदार विनित पांडुरंग देवरे वेस्टेक बायोन्हेन्वर ग्रुप-३ नाशिक, यांच्या विरोधात चौकशी करण्याकामी दिनांक २३ मे रोजी जिल्हाधिकारी सोलापुर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे अर्ज दिला होता. त्यानंतर तीन वेळा स्मरण पत्रे दिली, परंतु अद्याप पर्यंत प्रशासनाकडुन कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्यामुळे, दिनांक ०७ जुन रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती तक्रारकर्ते फारुक जमादार यांनी दिली. जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर ठेकेदाराने नगरपालिकेस साफसफाई स्वच्छतेची बिले, आवक रजिस्टरमध्ये न नोंदवता आरोग्य निरीक्षक यांच्याकडे जमा केली आहेत. ठेकेदाराने १२/९/२०२२ पासुन पंधरा दिवस कोणतीही पुर्व सुचना न देता काम बंद ठेवले होते. त्यावर नगरपालिकेने कोणतीही दंडात्मक कार्यवाही केलेली नाही. माजी नगराध्यक्षानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुर येथुन ६० सफाई कामगाराना घेऊन शहर स्वच्छ केले. त्याचेही बील ठेकेदाराला देण्यात आले आहे. सदर ठेक्यामध्ये करमाळा नगरपरिषदेचे अंदाजे ५० स्वच्छता कर्मचारी काम करतात. त्याची बिलेही ठेकेदाराला देण्यात येतात. ठेकेदाराच्या करारपत्रात नियम क्रमांक ३९ नुसार स्वच्छता साफसफाई ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे काम बंद ठेवता येत नाही. सदर ठेकेदाराने दोन वेळा काम बंद ठेवले होते परंतु मुख्याधिकारी यांनी ठेकेदारावर कोणतीही दंडात्मक कार्यवाही केलेली नाही. तसेच कायद्याने एखाद्या व्यक्तिने तक्रार नोंदविल्या नंतर सात दिवसात माहिती देणे बंधनकारक असताना सुध्दा, माहिती सहा महिन्यानी दिली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत शिस्तभंगाची व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनाच्या प्रति जिल्हा प्रशासन, नगरपालिका विभाग सोलापुर, जिल्हा पोलीस प्रमुख सोलापुर ग्रामीण, करमाळा पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.




Post a Comment