गेल्या काही वर्षात अपघातात शेकडो प्रवाशांचा बळी घेणाऱ्या करमाळा ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल, वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे काम बागल सर हे अनेक वर्ष करत आहेत. कोणताही स्वार्थ नसताना केवळ सामाजिक कार्य व सामाजिक बांधिलकी जपत, बागल सर यांनी गेल्या दोन-चार वर्षांमध्ये अनेक वेळा मुंबई-पुणे च्या वाऱ्या केलेल्या आहेत. मंत्रालयातील रस्ते विकास महामंडळ खात्याच्या मंत्र्यांना अनेक वेळा त्यांनी निवेदन सादर केलेली आहेत. एवढेच काय तर त्यांच्या या पाठपुराव्याला यश सुद्धा मिळाले होते. नुकतेच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय दळणवळण मंत्री नितिनजी गडकरी यांनी टेंभुर्णी ते जातेगाव या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाल्याचे जाहीर केले होते. परंतु तसे असून ही बऱ्याच दिवसांपासून काम सुरू न झाल्यामुळे, पुन्हा एकदा बागल सर यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे चिटणीस यांच्याकडे पाठपुरावा केला असता, त्यांना वरील धक्कादायक माहिती मिळाली. त्यानुसार बागल सर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सोलापूर यांना लेखी निवेदन दिले आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, करमाळा ते टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 चे, महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडे हस्तांतर नुकतेच झालेले आहे. परंतु सोलापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे चिटणीस यांनी मोनार्च डीपी कार्यालयास, या महामार्गाच्या डीपीचे काम लवकरात-लवकर पूर्ण करण्याचे लेखी आदेश देऊन ही, मोनार्च कंपनीच्या कार्यालयाने अद्याप काही ही हालचाल सुरू केलेली नाही. सदर कार्यालयास माझे सहकारी प्रमोद केकान यांनी ही प्रत्यक्ष दोन-तीन वेळेस भेट दिली असता, या महामार्गाच्या कामकाजास आम्ही अद्याप सुरूवात केलेली नाही. व आम्ही ते लवकर सुरू करू शकत नाही!!! असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप ही सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. तरी या दोन्ही कार्यालयाचा समन्वय आपण घडवून आणावा, व या महामार्गाच्या कामास गती द्यावी. अशी विनंती वजा निवेदन गुलाबराव बागल सर यांनी केलेले आहे.


Post a Comment