Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
            राज्यभरातील भटके विमुक्त, आदिवासी, ओबीसी, उपेक्षित बांधवांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी, जाधव गुरुजींनी राज्यभर उभारलेली प्रभावी चळवळ अनेकांसाठी दिशादर्शक ठरली. असे मत एकलव्य आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने यांनी व्यक्त केले. समाजातील वंचित, उपेक्षित घटकाच्या विकासासाठी कार्य उभारणारे सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक, औरंगाबाद येथील दिवंगत आसाराम जाधव गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त एकलव्य आश्रमशाळेत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रामकृष्ण माने हे बोलत होते. सुरुवातीला संत कैकाडी महाराज, आसाराम जाधव गुरुजी यांच्या प्रतिमांना इरुद्या भोसले, ललिता भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. पुढे बोलताना माने यांनी सांगितले की, आसाराम गुरुजी हे कृतीशील समाजसेवक होते. प्रतिकूल काळात त्यांनी भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालविले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेकजण उच्च पदस्थ अधिकारी बनले. समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच मार्गदर्शक राहणार आहे.
    
        याप्रसंगी बोलताना एकलव्य आश्रमशाळेच्या मार्गदर्शिका स्वाती माने यांनी सांगितले कि, समाजातील गरजू लोकांना आपले कुटुंब मानून गुरुजींनी कार्य केले. राज्यातील भटक्या विमुक्त, बंजारा, डवरी गोसावी, राजपूत भामटा, पारधी, कैकाडी, वैदू, गोंधळी अशा अनेक भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणताना स्वाभिमानाची शिकवण त्यांनी दिली. भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी मोर्चे, संप करून आवाज उठवला. तसेच सर्वप्रथम कैकाडी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे त्यांनी कार्य केले असे सांगितले.

         भटक्या विमुक्त जाती-जमाती संघटना, कैकाडी समाज संघटना, कैकाडी समाज सखी मंच आदींनी आयोजन केलेल्या या कार्यक्रमास संघटनेचे सदस्य, स्वाती अभिमन्यू माने, योगिता माने, विमल माने, अंजना माने तसेच आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अशोक सांगळे, शिक्षक किशोर शिंदे, विठ्ठल जाधव, विलास कलाल, भास्कर वाळुंजकर, कुमार पाटील, प्रल्हाद राऊत, विद्या पाटील, बाळासाहेब शिंदे, उमेश गायकवाड, ज्योती गायकवाड, वंदना भालशंकर, सैदास काळे, दीपाली माने आदी कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न व भोजन हि देण्यात आले.

Post a Comment