Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
           आज समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगणारे खूप सारे सामाजिक कार्यकर्ते घराघरांमध्ये निर्माण झालेले आहेत. त्याच अनुषंगाने समाजाला आव्हान अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जाते की, शिवजयंती घराघरात साजरी करा!!! अशी शिवजयंती घराघरांमध्ये साजरी करण्याचा उद्देश हाच असतो की, छत्रपतींचे विचार हे घरातील लहानापासून मोठ्या व्यक्तींच्या मनामध्ये रुजले पाहिजेत. परंतु हे विचार सांगत असताना समाजाला ही आता संशोधन करण्याची गरज निर्माण झालेली आहे की, अशा किती सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी बहुजन महापुरुषांची जयंती साजरी केली जाते? व किती जणाच्या घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत बहुजन महापुरुषांच्या विचारांची पेरणी केली जाते?

           19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरी होत आहे. याच अनुषंगाने शेतकरी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व करमाळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या यादीमधील अग्रगण्य नाव असलेले दशरथअण्णा कांबळे यांच्या घरी सुध्दा शिवजयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सदरील शिवजयंती कांबळे यांच्या घरी साजरी करण्यामागील त्यांचे विचार सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड बहुजनांचे राजे आहेत. ते कोणत्याही एका जाती धर्माचे नव्हते. परंतु जर काही समाजकंटक म्हणत असतील की, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे होते. तर आम्ही अशा नालायक लोकांचा निषेध तर करतोच. परंतु आम्ही आमच्या घरातील लहानापासून मोठ्या-व्यक्तींच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे बीज रोवत असताना सतत सांगत असतो की, महाराजांना कोणती जात अथवा धर्म नव्हता ते सर्वधर्मीय होते. अशा प्रकारचे विचार आम्ही लहानपणापासूनच आमच्या घरातील लहान सदस्यांच्या मनामध्ये रुजवत असतो. त्यामुळे "शिवजयंती घराघरात व शिव विचार मनामनात" हे ब्रीदवाक्य कुठेतरी सार्थकी लावण्याचा आमचा हा नेहमीचाच छोटासा प्रयत्न असतो. अशा प्रकारे कांबळे यांनी त्यांचे विचार मांडले.

            आज समाजामध्ये बहुजन महापुरुषांचे विचार व प्रेरणा प्रत्येक घरामध्ये रुजवायची व पोहोचवायची असेल, तर कृती आधी आपल्या स्वतःच्या घरापासून करणे गरजेचे बनलेले आहे. तरच समाजामध्ये नवीन विचार व नवीन प्रथा सुरू होईल....


Post a Comment