करमाळा-प्रतिनिधी
गायरान जमीन अतिक्रमण हटवणे गरीबांना उध्वस्त करणारे असून, शासनाने तातडीने न्यायालयाच्या आदेशाबाबत फेरविचार याचिका दाखल करावी. अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सध्या सर्वत्र गायरान अतिक्रमण हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्याने, सर्वसामान्य लाभार्थी नागरिक चिंतेत पडल्याने करमाळा मतदार संघातून न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार करावा. अन्यथा गोरगरीब नागरिकांच्या भवितव्य व अस्तित्वासाठी जनआंदोलन करण्यास तयार असल्याची भुमिका माजी आमदार नारायण पाटील यांनी घेतली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, गेली अनेक दशके प्रत्येक गावखेड्यातील गरीब नागरीक हा स्थानिक ग्रामपंचायत वा पंचायत समिती यांनी दिलेल्या गायरानाच्या जागांवर आपली घरे बांधून वास्तव्य करत आहे. शासनानेच विविध लाभयोजनातून घरकुले देऊन गरीब लाभार्थीना राहण्याची सोय करुन दिल्याने, आता अचानक त्याच प्रशासनाकडून घरे पाडली जाणे अन्यायकारक असुन, न्यायालयाचा हा आदेश जनसामान्यांच्या अन्न, वस्त्र व निवारा या मुलभुत सुविधांमधील निवारा उध्वस्त करणारा असा आहे. वास्तविक पाहता या गायरान जागांवर अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये, प्राथमिक शाळा, ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र यासह मंदिरे, मशीदी आदि अनेक वर्षांपासून उभ्या आहेत. यामुळे जनमाणसांच्या आरोग्य व शिक्षण सुविधांबाबत ही अशी अतिक्रमणे पाडल्याने बाधा येऊ शकते. तसेच मंदिर व मशीद हा श्रध्देशी निगडीत विषय असल्याने, याबाबत ही शासनाने जनभावना जाणून घ्याव्यात. मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत फेरविचार याचिका दाखल करुन, अनेकांना बेघर करणार्या या समस्येवर उपाय काढावा. अशी आग्रही मागणी आपण निवेदनाद्वारे केली असल्याचे, माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण करणार्या लोकांना याबाबत नोटीस देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नोटीस धारकांनी हतबल न होता नोटीशीसह जेऊर येथे आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी, एकत्रित विचार विनिमय करुन पुढील कायदेशीर अथवा वेळ पडल्यास शांततेच्या मार्गाने जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य बिभीषण आवटे, सभापती अतूल पाटील, उपसभापती गणेश चौधरी तसेच विविध गावचे प्रतिनिधी उपस्थित होते.



Post a Comment