शहरात गत चार वर्षापासून पर्यावरण बाबतीत काम करणाऱ्या वृक्ष संवर्धन समितीच्या एका उपक्रमाची OMG बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नुकतीच नोंद झाली आहे. याचे प्रमाणपत्र बार्शी तालुक्याचे प्रथम नागरीक आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते समितीने स्विकारले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन ९ ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी मार्फत हर घर तिरंगा, हर घर एक पेड हा उपक्रम राबवण्यात आला होता. यामध्ये वृक्ष संवर्धन समिती मार्फत बार्शी शहर व तालुक्यातील नागरीकांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांना आपल्या आप्तेष्ठांना पत्र लिहुन एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला बार्शी शहर व परीसरातुन उदंड प्रतिसाद मिळाला. व विक्रमी दहा हजार पंचाहत्तर पत्र बार्शीतील नागरीकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी लिहिली. या पत्राद्वारे आपल्या प्रिय व्यक्तिला एक झाड लावण्याची विनंती केली. अशा प्रकारे एकाच दिवसात एका विषयावर पत्र लिहण्याचा एक विक्रम झाला. त्यामुळे याची नोंद ओ.एम.जी.बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते समितीच्या सर्व सदस्यांनी प्रमाणपत्र स्विकारले. यावेळी पत्रकार सचिन वायकुळे तसेच वृक्ष संवर्धन समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष काळे म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासुन वृक्ष लागवड व संवर्धन चळवळ वाढावी, यासाठी वृक्ष संवर्धन समितीने अनेक उपक्रम घेतले आहेत. जसे की गच्चीवरील बाग, परस बाग स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, संक्राती निमित्त वाण म्हणुन देण्यासाठी मोफत फळांची रोपे वाटप, नवरात्रीनिमित्त दोन हजार जास्वंदीची रोपे वाटप आणि त्यातीलच "हर घर तिरंगा-हर घर एक पेड" या उपक्रमामुळे बार्शीत सुरु झालेली चळवळ नक्कीच महाराष्ट्रभर पोहोचणार आहे. या उपक्रमात बार्शीतील सर्व शाळांनी सहभाग घेतला व भारतीय डाक विभागाने देखील यात मोठे सहकार्य केले. यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील वृक्ष संवर्धन समितीच्या सर्वच उपक्रमाचे कौतुक केले. आणि या विक्रमामुळे बार्शीचे नाव देश पातळीवर झळकेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार सुधीर वाघमारे यांनी मानले.
वैराग-प्रतिनिधी (ओंकार गायकवाड)




Post a Comment