करमाळा एस.टी. बसस्थानकात विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी योग्य नियोजन करा; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे. पहिल्यांदा पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. मात्र येथे याचा माहिती फलक लावण्यात आलेला नाही. याशिवाय नियोजनाचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तालुक्यात सध्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची पास काढण्यासाठी एस.टी. स्टॅण्डवर गर्दी होत आहे. मात्र करमाळा एस.टी. आगाराकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत आगार प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर आगार प्रमुख आश्विनी किरगत या समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप केला जात आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एस.टी. बंद होती. दोन वर्ष कोरोनामुळे शाळाही बंद होत्या. आता शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे एस.टी.चा पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मात्र दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
त्वरित नियोजन करण्याची आवश्यकता....
करमाळा बसस्थानक हे तीन जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. त्यामुळे येथे कायम रहदारी असते. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांची पास काढण्यासाठी एकाच खिडकीत व्यवस्था आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. येथे गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. येथे चोऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा वेळ जात आहे. पास काढण्यासाठी काय कागदपत्र आवश्यक आहेत? याचा फलक लावावा. फलक नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा व पालकांचा वेळ जातो. शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पास काढण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. याची अनेक विद्यार्थ्यांना कल्पनाही नसते. पास काढायला आल्यानंतर याबाबत त्यांना समजत आहे.
- ऍड. शशिकांत नरुटे, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, करमाळा
नागरिकांची तक्रार ऐकायलाच हवी......नागरिकांच्या तक्रारींकवरून सोलापूर विभागीय वाहतूक अधिकारी (०२१७2733332) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा त्यांनी 'नागरिक कार्यालयात आल्यानंतर त्याची तक्रार ऐकून घ्यायलाच हवी. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना प्राधान्य द्यायला हवे. पाससाठी लागणारी कागदपत्रे व वेळ ठरवून देणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही वेळेबाबत नियोजन करायला हवे,' असे सांगितले.
काय आहेत तक्रारी...
- पाससाठी सकाळपासुन विद्यार्थी येतात तेथेच ज्येष्ठ नागरिकही गर्दी करत आहेत. त्यामुळे एकाच खिडकीवर गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक पाससाठी येतात. त्यांना दिवसभर थांबूनही पास मिळत नाही.
- पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना संगणकावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईलवरील ओटीपी आवश्यक आहे. लहान मुलांकडे मोबाईल नसतो. त्यामुळे पालकही येतात. मात्र तेथे नियोजनाचा अभाव आहे.
- सर्व्हर डाउनचा अडथळा असल्याचे सांगितले जात आहे. त्यातही वेगळ जात आहे.
- पास काढण्यासाठी मोबाईलची आवश्यकता आहे. मात्र याबाबत येथे फलक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती समजत नाही.
हे करता येतील उपाय......- पाससाठी काय कागदपपत्रे आवश्यक याचा किमान छोटा फलक लावावा.
- गर्दी होणार नाही म्हणून ज्येष्ठ नागरिक व मुलांची वेगळी रांग करावी.
- थोड्या दिवस ज्यादा कर्मचारी वर्ग नेमावा.
- सध्या एकच संगणक आहे त्यामुळे आणखी एक संगणक वाढवता येईल.




Post a Comment