करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल यांच्या गावातीलच मांगी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे गटाने सुजित बागल यांच्या नेतृत्वाखाली पॅनल 13 पैकी 11 जागा जिंकत, बागल गटाला त्यांच्या राहत्या गावातच जबरदस्त धक्का दिला आहे. मांगी सोसायटीची निवडणूक खुद्द माजी आमदार शामलताई बागल यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी या निवडणुकीसाठी स्वतः उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र ब्रह्मदेव माने सहकारी बँकेचे थकबाकीचे ऑब्जेक्शन घेऊन सुजित बागल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. सुजित बागल यांच्याकडे जयवंत मल्टीस्टेटची बाकी आहे. असे सांगत त्यांच्या अर्जावर आक्षेप बागल गटाकडून घेण्यात आला होता. मात्र यावेळी सुजित बागल यांनी एकरकमी कर्जफेड करून आपला अर्ज मंजूर करून घेतला होता.
या निवडणुकीत बागल यांच्या गटाला नारायण पाटील गटाचे समर्थक देवानंद बागल यांनी पाठिंबा दिला होता. नारायण पाटील गट व बागल गट एकत्र असताना आमदार संजयमामा शिंदे गटाने दोघांनाही धोबीपछाड देत 13 पैकी 11 जागा जिंकून एक हाती संस्था ताब्यात घेतली आहे. या मांगी सोसायटी मधूनच बागल गटाचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज जात असतो. मात्र तेथेच त्यांना ब्रेक लावण्याचे काम आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
हा तर कामाचा विजय!!! सुजित बागल
आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने मांगी गावात काम चालू असून, प्रत्येक गावकरी कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत. सोसायटीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे, मांगी येथील जनतेने आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आमच्या पॅनलला निवडून दिले. ऊसाचा गंभीर प्रश्न आमदार संजयमामा शिंदे यांनी सोडविला आहे.



Post a Comment