गेल्या अनेक महिन्यांपासून करमाळा तालुक्यातील 40-45 गावांचे त्यांच्या हक्काचे कुकडी धरणातून येणारे पाणी, त्यांना योग्यरित्या वितरित व्हावे. व यासाठी शासकीय पातळीवरून रिटेवाडी उपसा सिंचन हि योजना योग्य प्रकारे राबवून, तालुक्यातील 40-45 गावातील नागरिकांना न्याय द्यावा. यासाठी या गावातील लोकप्रतिनिधी शासन दरबारी याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या अनुषंगानेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची, रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर, पालकमंत्र्यांनी देखील राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत सदरच्या योजनेसंदर्भातील, सर्व अधिकारी वर्गाची नियोजित बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते.
या अनुषंगाने दि. 4 नोव्हेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतू जलसंपदा मंत्र्यांच्या 4 नोव्हेंबर रोजीच्या, त्यांच्या काही अपरिहार्य कारणांमुळे मंत्रालयातील बैठक रद्द करण्यात आली. परंतु जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे ओ.एस.डी. विजय शेटे व कार्यकारी अधिकारी जयदीप पवार यांची रिटेवाडी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर, त्यांनी सदरची बैठक काही अपरिहार्य कारणांमुळे जरी रद्द करण्यात आली असली, तरी सदरच्या योजनेबाबत येत्या 8-10 दिवसांत लवकरच मंत्री महोदय व अधिकाऱ्यां समवेत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल. अशा प्रकारे उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित केले.
तसेच संघर्ष समितीच्या प्रतिनिधींना याबाबत लवकरच संपर्क केला जाईल. अशा प्रकारचे आश्वासन दिल्यानंतर, संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री कार्यालयाचे संयुक्त बैठकीसाठीचे समन्वयक कोटेकर साहेब यांची भेट घेऊन, करमाळा तालुक्यातील सामान्य जनतेच्या दृष्टिने सदरची योजना अत्यंत महत्वाची असुन, यावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्या कार्यालयाकडून देखील जलद गतीने प्रयत्न व्हावे. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. यावर कोटेकर साहेब यांनी देखील सांगितले कि, आमच्या कार्यालयाकडून रिटेवाडी योजनेच्या संयुक्त बैठकीच्या आयोजनासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशा प्रकारे कोटेकर साहेबांनी देखील आश्वासित केले आहे. त्यामुळे रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, येत्या काही दिवसांमध्ये मंत्री महोदय तसेच अधिकारी वर्गांसमवेत संयुक्त बैठक होऊन, सदरच्या योजनेच्या दृष्टिने सकारात्मक पाऊल पडण्याची आता कुठेतरी आशा पल्लवित झालेली दिसुन येत आहे.





Post a Comment