Header Ads Widget

 


करमाळा-
               संगणकशास्त्र विषयात संशोधन करणारे प्रा.शरद भरत जाधव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारे पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. “हायब्रीड मशीन लर्निग टेकनिक फॉर पर्सन आयडेंटिफिकेशन युजिंग मल्टी मॉडेल पामप्रिंट इयर अँड फेस बायोमेट्रिक फीचर्स” या विषयावर त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले असून, मार्गदर्शक म्हणून कॉम्प्युटर सायन्स संकुलाचे संचालक प्रा. डॉ. निलेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

          सध्या ते महात्मा गांधी ज्यु. कॉलेज, करमाळा येथे संगणकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. जाधव यांच्या संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग व डीप लर्निंग आधारित मल्टिमोडल बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यात आली असून, व्यक्ती ओळख पटविण्याच्या क्षेत्रात उच्च अचूकता मिळविण्यात या पद्धतीने यश मिळविले आहे. ते अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणक विज्ञान संघटनांचे सदस्य असून स्प्रिंजर, वर्ल्ड सायंटिफिक आदी उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. आजवर ११ संशोधन लेख यशस्वीरीत्या प्रकाशित झाले असून, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा यात शोधपत्र सादरीकरण केले आहे. तसेच दैनिक सकाळ मध्ये ही संशोधन कार्य प्रकाशित झाले आहे. युवासंशोधक, करमाळारत्न तसेच उत्कृष्ट संशोधन पेपर व प्रथम बक्षीस अशा गौरवांनी ते सन्मानित झाले आहेत.

          संशोधनाच्या काळात त्यांना महाराष्ट्र शासनाची सारथी राजश्री छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार जयवंतराव जगताप, विश्वस्त वैभवराजे जगताप, विश्वस्त शंभूराजे जगताप, तसेच सर्व सहकारी प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



Post a Comment