मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा ओबीसी उप समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांची दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी भेट घेऊन, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना ही वस्तीग्रह भत्त्याची योजना लागू करावी अशी मागणी केली. या मागणीमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता ही योजना खुला प्रवर्ग, एसईबीसी, इ डब्ल्यू एस तसेच विद्यार्थ्यांना शहरी व ग्रामीण भागासाठी सरसकट लागू होते.
व त्याची उत्पन्न मर्यादेची अट हि रक्कम ८,००,००० रुपये एवढी असून, सदर योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील सादर करता येतो. व त्या उलट इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ मिळत असून, ही योजना फक्त शहरी भागासाठी लागू असून, उत्पन्न मर्यादेची अट ही रक्कम २,५०,००० रुपये एवढी आहे. तसेच सदर योजनेसाठी प्रति जिल्हा फक्त ६०० विद्यार्थी मर्यादा असून, त्याचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागतो.
तरी अशा पद्धतीने दोन्ही वस्तीग्रह योजनांमध्ये असलेली तफावत दूर करून, डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता या योजनेप्रमाणे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधारित योजना, ही शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील विद्यार्थ्यांना सरसकट लागू करावी. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाडीबीटी पोर्टलवर घेऊन, त्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया लागू करण्याबाबत सकारात्मक विचार करून, इतर मागासवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. अशी मागणी प्रा.रामदास झोळ सर यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा ओबीसी उप समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. यावेळी बावनकुळे यांनी हा विषय लवकरच बैठकीमध्ये मांडून, याची अंमलबजावणी करू असे आश्वासित केले आहे.







Post a Comment