Header Ads Widget

 


करमाळा-
            पुणे (लोणावळा) येथे महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच सन्मान व गौरव पुरस्कार सोहळा, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी सदरचा पुरस्कार निंभोरे गावचे लोकनियुक्त सरपंच, रविंद्र अंकुश वळेकर यांना 'महाराष्ट्राचे ग्रामरत्न पुरस्कार' देण्यात आला आहे. सरपंच रविंद्र वळेकर यांचे शाळा व विद्यालयासाठी असलेले योगदान, पाचवी पासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान असावे. यासाठी ते सलग 11 वर्षे शालेय स्पर्धा परीक्षा घेत आहेत. बक्षीस स्वरुपात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शाल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देत आहेत. परिणामी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळू लागले आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे. दहावीत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करून एक नवीन संकल्पना राबविली जाते.

           तसेच गावात आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीर, शेतकरी बांधवांसाठी तालुका स्तरीय अधिकाऱ्यांचे व्याख्यान आयोजित करणे, महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य शिबीरे घेणे, तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे, धार्मिक कामात सढळ हाताने मदत करणे, गावच्या विकासासाठी तन, मन, धनाने प्रयत्न करणे आदी. कामांमुळे सरपंच वळेकर लोकप्रिय झाले आहेत.

           निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा परतीचा मार्ग असलेला निंभोरे ते कोंढेज रस्ता, सरपंचांनी माजी आ. संजयमामा शिंदे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कडे पाठपुरावा करून तयार करून घेतला. तसेच गावासाठी आरोग्य उपकेंद्र व तलाठी ऑफिस मंजुर केले. पिढ्या न् पिढ्या न झालेला आणि अडचणीचा पानंद रस्ता देखील करून घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी घेऊन शाळेत कचराकुंडया बांधल्या. स्मशानभूमी साठी वॉल कंपाउंड बांधून पेविंग ब्लॉक टाकले. आंबेडकर नगर येथे पाण्याची टाकी बांधून घरोघरी नळ दिले. गावातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच गावातील मुख्य चौकात आणि मंदिरासमोर हायमास्ट दिवे उभारून, संपूर्ण गावठाणात लाईटची सोय केली. अशा सर्व विकासात्मक कार्याचा आढावा घेऊन, सरपंच रविंद्र वळेकर यांना महाराष्ट्राचे ग्रामरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.



Post a Comment