महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यत्वे करून श्रावणी बैलपोळा आणि भाद्रपद बैलपोळा असे दोन वेळा बैलपोळे साजरे केले जातात. आज भाद्रपदी पोळा होता. आजच्या धावत्या युगामध्ये वाशिंबे हे गाव आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा आज ही तेवढ्याच उत्साहामध्ये सर्वच परंपरा जोपासत आहेत. त्यामध्ये बैलपोळा हा सण मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. शेती करत असताना शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये बैल जोडी हा घटक खूप महत्त्वाचा असतो. आणि हीच बैल जोडी आपल्या धन्याच्या शेतामध्ये वर्षभर राबराब राबून शेती करण्यासाठी मदत करतात. त्यांचा ही कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून पूर्वज बैलपोळा हा सण साजरा करत आलेले आहेत. शेतकरी कुटुंबामध्ये बैलांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानले जाते.
आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये शेतकऱ्याच्या दारी बैल जोडी दिसणे कठीण झालेले आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा वाशिंबे गावातील मधुकर दत्तात्रय झोळ यांच्या कुटुंबीयांनी बैल जोडी सांभाळली आहे. आणि प्रत्येक वर्षी अगदी मोठ्या उत्साहामध्ये बैलपोळा हा सण साजरा करतात. बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांची खांदा मळणी करतात, बैलांना स्वच्छ धुऊन त्यांना रंग देऊन, सिंगांना गोंडे, फुगे लावून बैलांच्या पाठीवर झूल टाकून अतिशय सुंदर अशा प्रकारे बैलांना झोळ कुटुंबीय सजवतात. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन त्या बैल जोडीला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. तसेच परंपरेनुसार बैलांचे मंगलाष्टिका म्हणून लग्नही लावतात. मधुकर झोळ यांची पत्नी चार मुलं, चार सुना, आणि सर्व नातवंडे या बैलपोळा सणामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी असतात. वाशिंबे या गावांमध्ये आज ही बैलपोळा साजरा होतो. हे गावाच्या परंपरेसाठी अभिमानाची बाब आहे. हीच परंपरा पुढच्या पिढीकडे ही संक्रमित होईल अशी आशा झोळ कुटुंबीय व वाशिंबेकरांची आहे.






Post a Comment