करमाळा तालुक्यातील डिकसळ-काेंढारचिंचाेली पुलाचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदना द्वारे केली होती. याचीच दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास कोंढारचिंचोली डिकसळ पूलाचे काम वेगाने करावे याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना प्राप्त झाल्या असून, पूलाचा नवीन आराखडा तयार करण्याचे काम सद्या सुरू आहे. अशी माहीती शिवसेना नेते दिग्विजय बागल यांनी दिली आहे. यावेळी बागल यांनी अधिक बोलताना सांगितले की, करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील २० ते २५ गावांतील नागरिकांना भिगवण, बारामती, इंदापूर या ठिकाणी जाण्यासाठी धोकादायक ब्रिटीशकालिन पूलाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे शासनाकडून नवीन पुलाचे काम करण्यासाठी शासनाकडून ५५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. संबंधित ठेकोदारास तीन वर्षांत काम पूर्ण करणे बंधनकारक असताना, दिड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी कामात प्रगती नाही.
सद्याचा पूल धोकादायक असल्याने वाहतुकीसाठी बंद आहे. परिणामी नागरीकांना राशीन मार्गे भिगवण, बारामती येथे जावे लागते. त्यामुळे कामास गती द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कडे केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागास लवकरात-लवकर काम पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून, पुढील काम लवकरात-लवकर व्हावे. यासाठी नवीन आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच हा पूल पूर्णत्वास येई पर्यंत शासनस्तरावर माझा अखंड पाठपूरावा सुरू राहणार असल्याचे, बागल यांनी बोलताना सांगितले.
कोंढारचिंचोली डिकसळ पूलाचे काम नवीन आराखड्यानुसार करण्यासंदर्भात वरिष्ठांकडून सुचना प्राप्त झाल्या आहेत. अधिक्षक अभियंता सोलापूर यांनी पूलाची स्थळ पाहणी केली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत झालेल्या कामाशी एकरुप होईल. व प्राप्त निधीतूनच पाणी असताना जास्तीत-जास्त दिवस काम चालेल. अशा प्रकारे आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
अभिषेक पवार (उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा)






Post a Comment