Header Ads Widget

 


करमाळा-
        राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शैक्षणिक शाखा असलेल्या 'शिक्षा संस्कृती उत्थान न्यास'च्या वतीने, केरळ मधील येडापल्ली येथे राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांना 'शिक्षा संस्कृती उत्थान न्यास'चे केंद्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका आली असून, ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. 'ज्ञानसभा' नावाची ही परिषद 25 ते 28 जुलै रोजी होणार असून, देशभरातील आघाडीचे शिक्षणतज्ञ, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, विविध राज्यांचे शिक्षणमंत्री या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत 27 जुलै रोजी, शिक्षणातील भारतीयकरण आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची व्यापक अंमलबजावणी या विषयावर बोलण्याची शक्यता आहे. 

         विकसित भारतासाठी शिक्षण या विषयावर ही परिषद केंद्रित आहे. गायत्री परिवार, आर्ट ऑफ लिविंग, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन आणि विवेकानंद योग अनुसंधान केंद्र यासारख्या आघाडीच्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी देखील चार दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी होतील.

          या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या काही मान्यवरांमध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) वरिष्ठ पदाधिकारी यांचा समावेश आहे. देशातील सुमारे 70-80 विद्यापीठांचे कुलगुरू ही सहभागी होण्याची अपेक्षा आहे.


Post a Comment