करमाळा तालुक्याच्या पूर्वभागातील प्रचार दौर्यावर असताना, माजी आ. संजयमामा शिंदे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या प्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, विश्वंभर फरतडे ,शांतीलाल फरतडे यांनी माजी आमदार संजयममा शिंदे यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी सालसे ऊस उत्पादक गटातील उमेदवार नवनाथ जगदाळे यांच्यासह, उद्धव माळी व हिवरे येथील ऊस उत्पादक उपस्थित होते. कोणत्या ही परस्थितीत आदिनाथ सहकारी साखर कारखाना जिंकून यशस्वी पणे चालवून कारखान्याला गतवैभव निर्माण करून देण्याचा निर्धार केल्याने संजयमामा शिंदे यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
फरतडे यांच्या विषयी बोलायचे झाल्यास ते अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. बंडखोरी नंतर देखील त्यांनी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने पक्षाने त्यांना उपजिल्हाप्रमुख पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी तालुक्यातील समाजहिताच्या प्रश्नावर सातत्याने जनांदोलन केली आहेत. कुकडीचे ओव्हर फ्लो पाणी सिना कोळगाव धरणात सोडवण्यासाठी करमाळा ते मुंबई पायी दिंडी, कर्जमाफी, ऊस वाहतुकदारांच्या फसवणूकी संदर्भात तसेच सर्वच कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी त्यांनी यशस्वी आंदोलने केली आहेत. तसेच तालुक्यातील प्रत्येक निवडणूकीत ते पक्षाच्या आदेशाप्रमाणे सक्रिय राहिले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत पक्षादेश मानून त्यांनी खा.धैर्यशिल मोहिते पाटील व आमदार नारायण पाटील यांच्यासाठी झोकून काम केले होते. मात्र आता आदिनाथच्या निवडणूकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या, कारखाना निवडणूकीत ते संजयमामा यांना बळ देतील का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यापूर्वीच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुभाष गुळवे यांनी जाहीरपणे संजयमामा शिंदे यांचे समर्थन केले आहे. आता ठाकरे यांची शिवसेना ही संजयमामा शिंदे यांना बळ देणार का? ते पाहावे लागणार आहे. असे झाल्यास करमाळ्यातील महाविकास आघाडीत महाबिघाडी झाल्याचे चित्र दिसणार आहे.
पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.....
आदिनाथ कारखाना हे शेतकऱ्यांचे मंदिर असून त्यास पुन्हा गतवैभव प्राप्त झाले पाहिजे. कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांची थकीत देणी मिळावीत तसेच फसवणूक झालेल्या ऊस वाहतुकदार यांना न्याय देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे. अशी आमची भूमिका आहे. हा शब्द दिल्यास शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ....
शाहूदादा फरतडे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख)





Post a Comment