वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी पाटीची (एच एसआरपी) सक्ती केल्याने वाहनधारकांतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक घरांमध्ये 3 -4 दुचाकी किंवा चार चाकी वाहने आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहनांसाठी ही नवीन नंबर प्लेट लावावी लागणार असल्याने पैसे खर्च होणार आहेत. अगोदरच महागाई आणि बेरोजगारीने नागरिक त्रस्त असताना हा अनावश्यक खर्च वाटत आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत केलेल्या वाहनांसाठी 30 एप्रिल 2024 पर्यंत सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांच्या संबंधित गुन्हे रोखण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. त्यानुसार राज्यात वाहनाच्या नंबर प्लेट बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविल्यानंतर चोरीला गेलेली वाहने सापडतील याचा भरवसा नाही. फक्त देशभर एकाच क्रमांकाची दोन वाहने असणार नाहीत. एकाच नंबरची प्लेट दुसऱ्या वाहनाला बसविता येणार नाही. हाय सुरक्षा प्लेट बसविण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार 400 ते 700 रुपये पर्यंत खर्च येणार आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी बसवताना मुदतवाढ दिलेली असताना, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी या निर्णयाची कुठेही जाहिरात केलेली नाही. किंवा वाहतूक पोलिसांकडून ही जनजागृती करीत नसल्याने सर्वसामान्यांपर्यंत हा विषय पोहोचलाच नाही. त्यामुळे मुदत वाढीची तारीख संपल्यानंतर, अनेक वाहन चालकांना मोठ्या दंडाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
"एचएसआरपी नंबर प्लेट बाबत ग्रामीण भागात म्हणावी तशी" जनजागृती" अद्यापही झालेली नाही. यासाठी शासनाकडून जनजागृती होणे गरजेचे महत्त्वाचे आहे. वाहन चालक अनेक प्रकारचे कर भरत असल्याने, या शुल्कात कपात व्हावी तसेच एचएसआरपी नंबर प्लेट टाकण्यासाठी करमाळा येथे केंद्र सुरू करावे. राष्ट्रीय सुरक्षितता तसेच वाहन ओळख पद्धती सुधारली जाऊन या गोष्टीचा सर्वसामान्य नागरिकांना फायदाच होईल.
ॲड.अजित विघ्ने,माजी उपाध्यक्ष, करमाळा वकील संघ





Post a Comment