मे 2024 मध्ये करमाळा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना पंचनामे करून मदत द्यावी. अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यावेळी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यासह 48 तासात पंचनामे पूर्ण करून माहिती शासनास सादर केली होती. तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी गवसने यांच्याकडे सातत्याने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पाठपुरावा केला होता.
करमाळा तालुक्यातील विशेषतः उमरड, सोगाव, चिखलठाण, वांगी सह नुकसान झालेल्या, 4773 केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात आले होते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मशेलकर यांनी या नुकसान झालेल्या पिकाचे, प्रत्यक्षात शेतावर जाऊन पाहणी करून तेथूनच थेट तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल केला होता. यानंतर 4773 केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 कोटी 27 लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया करमाळा तहसील कार्यालय मार्फत सुरू झाली होती. नुकसान झालेले केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, उमरड येथील प्रमोद बदे, दत्तू गव्हाणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मे 2024 मध्ये वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या केळी जमिनीवर लोळल्या होत्या. यावेळी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी तात्काळ पंचनामे करण्यासाठी, महसूल विभागाने महत्त्वाची भूमिका पार पाडली. यामुळे ही नुकसान भरपाई मिळत असल्याचे शेतकऱ्यांना समाधान आहे.





Post a Comment