शेलगाव क. ता. करमाळा येथील रहिवाशी व सध्या जुन्नर, जिल्हा पुणे येथे कार्यरत असलेले, प्रा. इंद्रजीत वीर यांची कन्या कुमारी नवता इंद्रजित वीर हिची १०० मी. धावणे (Girls Under-8) या खेळ प्रकारासाठी, महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२५ या पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या, जिल्हास्तरीय सब ज्युनिअर खेळ गटामध्ये ८ वर्षांखालील मुलींच्या गटातून १०० मी. धावणे या खेळ प्रकारात नवता हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. आता ती पंढरपूर जि. सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जुन्नर तालुक्यातील सर्वात लहान खेळाडू म्हणून ही प्रथमच निवड झाली आहे. नवता ही जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय जुन्नर, या विद्यालयाची विद्यार्थिनी असून ती इयत्ता दुसरीत शिकत आहे. तिला द लिजेंड अकॅडमी जुन्नरचे प्रमुख दिशांत मेहेर व वर्गशिक्षक अतुल औटी यांनी मार्गदर्शन केले आहे. जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. सुधीर ढोबळे, उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष धनेश संचेती, सेक्रेटरी ऍड. अविनाश थोरवे व कार्यकारी मंडळ सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला थोरवे यांनी नवता व तिच्या प्रशिक्षकांचे, संस्था व शाळेच्या वतीने अभिनंदन केले व राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




Post a Comment