भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांच्या उच्च मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातून विचार केलेला असून, प्रत्येकाचे नैसर्गिक स्वातंत्र्य व अधिकारांची कायदेशीर जपणूक केली आहे. म्हणून प्रत्येक भारतीयाचा कणा ताठ असल्याचे प्रतिपादन पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांनी केले. करमाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात “हर घर संविधान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त “प्रजासत्ताक व भारतीय संविधान“ या विषयावर पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दहिदूले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक सुभाष भोसले हे होते.
संविधानाविषयी पुढे बोलताना दामोदरे यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी विशेष आस्था बाळगत, संविधान मूल्याचे प्रचारक-प्रसारक म्हणून समाजात भूमिका घेऊन या देशाची एकात्मता, अखंडता व बंधुभाव कायम रहावा. यासाठी सक्रीय रहावे. संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त सर्वांनी संविधानाची मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करावा. संविधानाच्या रूपात डॉ. बाबासाहेब जिवंत असल्याची निष्ठा प्रत्येक अनुयायाची असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. व्याख्यानाचा समारोप संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन करण्यात आला.




Post a Comment