करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आ. संजयमामा शिंदे यांनी महायुतीची उमेदवारी नाकारून, अपक्ष उभारण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेना लढवणार, असा दावा शिवसेनेचे करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांनी केला होता. आता मात्र करमाळा मतदार संघावर भाजपने दावा केला असून, रश्मी बागल यांना करमाळा विधानसभेतून महायुतीची उमेदवारी देण्यासाठी, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. श्रीकांत भारतीय यांनी आग्रह धरल्याचे वृत्त आहे. दरम्यान अपक्ष आ. संजयमामा शिंदे यांना महायुतीने पुरस्कृत करावे असा ही प्रस्ताव समोर येत आहे. करमाळा मतदारसंघ गेली 25 वर्षापासून शिवसेना धनुष्यबाणावर लढवत असून, हा मतदारसंघ शिवसेनाच लढवणार! असा दावा शिवसेनेच्या प्रवक्ते ज्योतीताई वाघमारे, सोलापूर लोकसभा जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, युवासेनेचे सचिव किरण साळी, तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांनी करमाळा च्या दौऱ्यात वारंवार केला आहे. आता मात्र हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार का? भाजपला जाणार? यावर मुंबईत चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना तालुका संपर्कप्रमुख रवी आमले म्हणाले की, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे आमच्याकडे सक्षम उमेदवार असून, त्यांच्या उमेदवारीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत दादा शिंदे यांच्याकडे आग्रह धरला आहे. या संदर्भात बाळासाहेब भवन मुंबई येथे चर्चा होणार आहे. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय शिवसैनिक मान्य करणार असून, महायुतीचा उमेदवार करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. उमेदवार धनुष्यबाणावरच असावा ही आमची भूमिका असेल, महेश चिवटे
शिवसेनेकडून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, दुसऱ्या कोणाला माझ्यापेक्षा चांगल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर माझी हरकत नाही. मात्र उमेदवार धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणारा पाहिजे. ही भूमिका मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.






Post a Comment