Header Ads Widget

 


करमाळा-
           करमाळा शहराला कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उजनी धरण 100 टक्के भरलेले असताना देखील, शहरात 4 ते 5 दिवसातुन एकदा पाणी पुरवठा तोसुद्धा कमी दाबाने केला जात आहे. सध्या सणासुध्दीचे दिवस असताना देखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे "जनसेवा हिच ईश्वर सेवा'' हे वाक्य नगरपालिकेवर लिहिलेले आहे. त्याप्रमाणे मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी फक्त कागदावरच न ठेवता प्रत्यक्ष अनुकरण करावे. असे मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी उद़्गार काढले आहेत. करमाळा शहरात पुर्वी एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. पाणी बील मात्र महिन्याचे घेवून महिन्यात 10 दिवस देखील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात नाही. 

नगरपरिषदेकडून कृत्रिमरित्या पाणी टंचाई सुरु आहे. पाणी पुरवठया बाबत विचारणा केली असता मोटार बिघडलेली आहे, दहिगावमध्ये लाईटचा प्रॉब्लम आहे, पाण्याची लेव्हल नाही, अशी तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत. करमाळा शहराचा पाणी पुरवठा हा केवळ एका मोटारीवर चालू आहे का? अशाप्रकारची अडचण येऊ शकते, याचा विचार करुन करमाळा नगरपरिषदेने राखीव मोटारी सुध्दा दुरुस्त करुन ठेवत नाहीत. तसेच करमाळा शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. करमाळा शहरातून मिळकतधारकांकडून लाखो रुपयाचा कर वसुल करुन, करमाळा शहरातील नागरिकांना घाणीमध्ये राहवे लागत आहे. शहरातील स्वच्छतेच्या ठेक्यासाठी महिन्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च केला जात असताना सुध्दा, शहरातील गल्ली, बोळ, बाजार पेठ, बगीचा, उद्याने, ओपन स्पेसमध्ये मोठया प्रमाणावर कचरा, राडारोडा पडलेला आहे. यामुळे करमाळा शहर हे बकाल परिस्थितीत आहे.

त्याचप्रमाणे शहरातील खंदकरोड, मोहल्ला गल्लीसह इतर ही भागात व अगदी नगरपरिषद कार्यालयासमोर देखील मोठया प्रमाणावर बाभळी वाढलेल्या आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. करमाळा नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी येताना त्यांना परिसरात वाढलेल्या बाभळी, कचरा दिसत नाही का? स्वच्छता ही कागदावरच आहे महिन्याला लाखो रुपयांची स्वच्छतेची बीले काढली जात आहेत. त्याअनुषंगाने कृत्रिम पाणी टंचाई दुर करुन शहाराला सुरळीत दररोज पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करावा. तसेच शहरात स्वच्छता करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनआंदोलन हे उभा केले जाईल. अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा ता.अध्यक्ष संजय घोलप यांनी दिला आहे.

            दहिगाव येथून पाण्याचा उपसा करुन तो करमाळा शहराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु दहिगाव येथील पाणीपुरवठ्यासाठी असणाऱ्या मोटरी १९९० साली बसविलेल्या जुन्या आहेत. त्यामुळे त्या मोटरी बदलल्यास व  शहरातील काही ठिकाणची पाईपलाईन बदलणे सुद्धा गरजेचे आहे. त्यासंबंधी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकिय मान्यतेसाठी फाईल पाठविलेली आहे. सदरची फाईल येत्या दोन दिवसामध्ये मंजूर झाल्यास लवकरच पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु होईल. व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या मिटणार आहे. त्याचप्रमाणे शहरामधील अस्वस्छतेच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढून, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून दोन पाळ्यांमध्ये शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने सकाळ व सायंकाळच्या वेळेत शहर स्वच्छ करुन घेणार आहे.

सचिन तपसे (मुख्याधिकारी, करमाळा नगरपरिषद)

Post a Comment