करमाळा-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खरात बंधू यांची तिसरी पिढी आज ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन, भीम गीत गायनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करण्याचे काम करत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उदरनिर्वाहाचे कोणते ही साधन नसलेले मोलमजुरी करून जगणारे, हि खरात कुटुंबाची तिसरी पिढी आज हि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती स्वतः लिहिलेली गाणी त्यांच्या सुरेल आवाजात व तालबद्ध रचनेमध्ये सादर करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील घराघरात पोहोचविण्याचे काम करत आहेत. आजोबा पणजोबाच्या काळातील वाद्य त्यांनी आज ही कशीबशी जपलेली आहेत. परंतु त्या वाद्यांची दुरावस्था पाहता खरोखरच हे कलाकार किती उपेक्षित आहेत हे जाणवते.
शासन दरबारी उपेक्षित कलाकारांची नोंद न झाल्यामुळे, अशा कलाकारांना शासनाकडून कोणती ही मदत अथवा मानधन मिळत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी व मिळेल ते काम करतात. व वर्षातून दोन महिने हे कलाकार महाराष्ट्रातील गावोगावी फिरून गायनाची कला सादर करतात. व त्यातून थोडेफार पैसे धान्य मिळवतात. त्यात हि हलाखीची परिस्थिती असल्यामुळे यांच्या पाल्यांचे जेमतेम जिल्हा परिषद शाळेपर्यंतच शिक्षण होते. हे खुप मोठे दुर्दैव आहे. दररोज पोटाचे खळगे भरण्यासाठी धावपळ करण्यात व्यस्त असणारे हे लोक मात्र उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा या उपेक्षित कलाकारांना शासन दरबारी न्याय मिळावा. अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासुन होत आहे. तरी या उपेक्षित घटकाला शासन दरबारी कधी न्याय मिळेल? व शासन कधी याकडे लक्ष देईल? याचीच हा उपेक्षित घटक वाट पाहत आहे.


Post a Comment