Header Ads Widget

 


उपळवटे-प्रतिनिधी (संदिप घोरपडे)
          सोलापूर व पुणे या दोन जिल्ह्यांच्या सीमांना जवळ आणणारे माध्यम म्हटले तर भीमा नदीवरील डिकसळ पूल, या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे सध्या पाऊस सुरु असल्यामुळे, पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत आहे. या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या गाड्या घसरून पडत आहेत. डिकसळ पुलावरून प्रवास करणारे विविध व्यावसायिक, मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी हे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातून भिगवणला ये-जा करत असतात. या पुलावरील खड्ड्यांमुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याप्रमाणे वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
           बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन, याठिकाणी मोठी जीवितहानी होण्या आधी खड्डे बुजविण्यात यावेत. अनेकांना या पुलावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने प्रशासनाने या रस्त्याची दखल घेऊन, डिकसळ पुलावरील मार्ग लवकरात-लवकर दुरुस्त करावा. अशा प्रकारची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Post a Comment