करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
करमाळा तालुक्यात दरवर्षी प्रमाणे विविध ग्रामदैवतांचा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु २०२३-२४ या वर्षामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे, शेतकरी, कामगार, मजूर व इतर छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे बाजारपेठेतील चलन काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसुन येत आहे. पाऊस मुबलक प्रमाणात झाला नसल्यामुळे सोलापूर, पुणे, नगर व इतर हि काही जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरणारे उजनी धरण अल्पशा पडलेल्या पावसावर मात्र ६०% भरले गेले. धरणामध्ये असलेल्या पाण्याचेच योग्य प्रमाणात नियोजन केले असते तर, संपुर्ण उन्हाळ्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली नसती. परंतु धरणातील पाणी वारेमापपणे कॕनॉलद्वारे सोडण्यात आले. त्यामुळे शेतीतुन शेतकऱ्याने काही प्रमाणात का असेना उत्पन्न घेऊन, त्याचे सण-उत्सव साजरे करण्यावर बंधने आली. याचाच परिणाम आता करमाळा तालुक्यात सुरु असलेल्या ग्रामदैवतांच्या यात्रा उत्सवावर सुध्दा दिसु लागला आहे. सण, यात्रा, उत्सव म्हटले कि मोठ्या प्रमाणात खरेदी, धामधूम, पाहुण्यांची रेलचेल हि दिसुन येते. परंतु यात्रेतील खरेदी व मोठा गाजावाजा हा काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसुन येत आहे. तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये ग्रामदैवताला यात्रेनिमित्त शेरणी (प्रसाद) दाखविला जातो. या शेरणीमध्ये गुळ, पेढा अथवा चपात्या चुरुन त्यामध्ये गुळ एकत्रित करुन ग्रामदैवताला प्रसाद म्हणुन दाखविला जातो. परंतु ग्रामदैवताला हि शेरणी दाखविण्यासाठी नेत असताना मोठ-मोठी वाद्ये वाजवत सदरची शेरणी मंदिराकडे नेण्यात येते. परंतु यावर्षी ग्रामदैवताला दाखविण्यात येणारी शेरणी सुध्दा मोठा गाजावाजा न करता, हलग्या वाजवत आनंद व्यक्त केला असल्याचे चित्र बहुतांशी यात्रांमध्ये दिसुन आले. लहान मुलांची खेळणी विक्रेत्यांचा सुद्धा दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या विक्रीवर, मात्र यावर्षीच्या यात्रेमधील साहित्यांची विक्री झाली नसल्याचे काहीसे चित्र दिसुन येत होते. त्यामुळे सध्या तालुक्यामध्ये साजऱ्या होत असलेल्या ग्रामदैवतांच्या यात्रांवर दुष्काळाचे काही प्रमाणात सावट पसरल्याचे दिसुन येत आहे. तरी यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडावा. यासाठी अनेक भाविक-भक्तांनी ग्रामदैवतांच्या चरणी प्रार्थना केली असणार यात काही शंकाच नाही.




Post a Comment