Header Ads Widget

 


करमाळा ता.-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)
             यावर्षी मांगी तलाव पूर्ण कोरडा पडल्यामुळे, तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करून वाहतूक केली जात आहे. मोठ-मोठे हायवा व डंपरमध्ये हा गाळ प्रमाणापेक्षा जास्त भरून, सदरची वाहतुक हि मांगी गावातून केली जात आहे. विशेष म्हणजे या वाहतुकीला मांगी येथील डाव्या कालव्याच्या बाजूने रस्ता असून ही, सदरची वाहतुक गावातूनच केली जात आहे. या डंपरमध्ये भरलेला गाळ अक्षरशः नागरिकांच्या अंगावर पडत आहे. कधी-कधी तर रस्त्यावरून, ये-जा करणाऱ्या नागरिकांना व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून गावातुन इतरत्र जावे लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, नव्यानेच बांधलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला  या 24 तास होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात हादरे बसत आहेत. परवा झालेल्या पावसामुळे येथील पुला लगत सदरच्या वाहतुक करणाऱ्या वाहनांमधून पडलेल्या गाळामुळे, रस्त्यावरती घसरन सुरु झाली होती. यामुळे अनेक दुचाकी वाहने घसरून पडून त्याचे वाहन चालक जखमी झालेले आहेत. 
          मांगी गावातून गाळाची वाहतुक 24 तास वाहतूक सुरू आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात धूळीचे प्रमाण जास्त झाले असल्यामुळे, अबाल वृद्धांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मांगी ग्रामपंचायतीने सदरच्या वाहतुकितुन नागरिकांना निर्माण होणाऱ्या समस्येकडे तात्काळ लक्ष घालून गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांना डाव्या कॅनॉलच्या रस्त्यावरून वाहतूक करण्याच्या सूचना द्याव्यात. अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

अशोकशेठ नरसाळे

           मांगी येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळून ही मोठ्या वाहनांची 24 तास वाहतूक हाेत असल्यामुळे, मंदिराला हादरे बसत असून तडे जाण्याची शक्यता आहे. याकडे मांगी ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा जर या वाहतुकिमुळे, अपमान झाला तर ग्रामस्थ कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

भैरवनाथ बागल

Post a Comment