करमाळा-प्रतिनिधी
ज्या विद्यार्थ्यांनी पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण कॉम्प्युटर किंवा आयटी या शाखेतुन पुर्ण केलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेशाची संधी, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासुन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी उपलब्ध करून दिलेली असुन, प्रवेशाची मुदत 25 जुलै 2023 अशी आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये तसेच राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तकामध्ये देखील याचा समावेश करण्यात आलेला आहे. अशी माहिती स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे. मागील काही वर्षातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास येते की, कॉम्प्युटर व आयटी हे पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त झालेली आहे. परंतु सदर शाखांच्या पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोजक्याच जागा उपलब्ध असल्याने, विद्यार्थ्यांची इच्छा असुन देखील पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुढील शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करण्याचा पर्याय निवडतात. परंतु एखाद्या विद्यार्थ्यांला कॉम्प्युटर या शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकीच्या जागा पुर्णपणे भरलेल्या असल्यामुळे, जर पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावयाचे असेल. तर सदर विद्यार्थ्याला मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला Lateral Entry द्वारे प्रवेशाची संधी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दोन वर्षांऐवजी फक्त एकाच वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. असे प्रा. झोळ यांनी सांगितले. तर पुढे बोलताना प्रा. झोळ म्हणाले कि, कॉम्प्युटर व आयटी पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या, ज्या विद्यार्थ्यांना संबंधित शाखेतून पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकीला प्रवेश मिळालेला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांनी थेट द्वितीय वर्ष मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी, Lateral Entry द्वारे प्रवेशासाठीच्या पर्यायाबाबत देखील जरूर विचार करावा. व लवकरच या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कडून प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रवेशाची मुदत 25 जुलै 2023 पर्यंत आहे. तरी अशा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षेच्या संकेतस्थळावर नोंदणी सुरू होताच, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.



Post a Comment