सोलापूर-प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरी करावी. तसेच महापुरुषांनी जपलेली मानवी मूल्ये जयंतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावी. उत्सव मंडळांनी स्वच्छता, वृक्षारोपण, जलसंवर्धन, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यासंदर्भात जनजागृती करावी. आरोग्य व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती उत्सवावेळी कराव्यात. असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी शांतता कमिटीच्या बैठकीवेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना केले. सोलापूर शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. उत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी. मंडपांसाठी सार्वजनिक रस्त्याची दोन तृतीअंश जागा मोकळी सोडावी. मोकाट जनावरांपासून फोटो किंवा मूर्तीला धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. 'महावितरण' कडून अधिकृत वीज जोडणी घ्यावी. मिरवणुकीतील वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घ्यावी. लांब कंटेनर मिरवणुकीसाठी वापरू नये, मूर्तीसमोर स्वयंसेवक उभे करावेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज व्हायरल न करता पोलिसांना त्याची माहिती द्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेऊ नये. अशा सूचना पोलिस आयुक्त डॉ. माने यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीत साहित्यरत्न मध्यवर्ती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत देडे, प्रमुख सल्लागार सुहास शिंदे, सुरेश पाटोळे, लखन गायकवाड, युवराज पवार, सोहन लोंढे, हिरालाल आडगळे, पूजा खंदारे यांनी सूचना मांडल्या. उत्सव मंडळांनी संबंधित पोलिस ठाण्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाईन परवाना घ्यावा. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीसाठी पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, विजय कबाडे, अजय बोऱ्हाडे, सहायक आयुक्त दीपक आर्वे, प्रांजली सोनवणे, महापालिकेचे नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment