Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
           करमाळा नगरपरिषदे कडून नागरी सुविधेच्या अपुऱ्या पुरवठ्यांबाबत व अतिक्रमित व्यावसायिकांकडून होणाऱ्या करवसुलीबाबत, वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने प्रांत अधिकारी, माढा डिव्हीजन कुर्डुवाडी यांना ईमेल व्दारे शहरातील विविध समस्यांविषयी निवेदन पाठविण्यात आले आहे. 
           सदरील निवेदनात शहरातील समस्यांविषयी सांगण्यात आले आहे कि, करमाळा शहरातील विविध भागांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या बाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते उडावा-उडवीची उत्तर देतात. पाणीपुरवठा विभागात चौकशी केली असता एकमेकांकडे बोट दाखवत खोटी माहिती दिली जाते. तसेच एखादा नागरीक चौकशी करिता गेला असता त्यास चेष्ठेच्या स्वरुपात उत्तरे दिली जातात.

         तरी यापूर्वी दि. 17/2/2023 रोजी करमाळा नगर परिषदे समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने उपोषणही करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडून लेखी स्वरुपात आश्वासन देण्यात आले होते. शहरातील सर्व प्रकारच्या समस्यांची सोडवणूक करू! परंतु कालांतराने या निर्देशित गोष्टींचा विचार केला गेला नाही. त्यामुळे जनतेच्या मनात प्रशासनाविरोधात रोष निर्माण होत आहे. व या रोषाला नगर परिषद अधिकारी हेच सर्वस्वी जबाबदार आहेत.

          तरी या पार्श्वभूमीवर मा.महोदय, आपणांस विनंती आहे की, आपण या प्रकरणी लक्ष घालून सदर मुलभूत गरजा पूर्ण करण्यास त्यांना आदेशित करावे. अन्यथा करमाळा नगर परिषदेच्या कार्यालयास 'कुलूप ठोको' आंदोलन केले जाईल. त्याचबरोबर नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण धारक व हातगाडे व्यावसायिकांकडून, जबरदस्तीने अव्वाच्या सव्वा नगर परिषद ठेकेदारांमार्फत दहा रुपयांऐवजी 50 ते 60 रु. दादागिरी करुन करवसुली केली जात आहे. मुख्याधिकारी साहेबांना याबाबत कळविले असता ते याकडे पाठ फिरवत आहेत. तरी शहरामध्ये विविध प्रकारे चर्चा सुरु आहे कि, मुख्याधिकारी सो हे ठेकेदाराकडून आर्थिक व्यवहारांतून तडजोडीत आहेत का? अशा नागरीकांमध्ये चर्चा आहेत. याची देखील चौकशी व्हावी. तरी आपणांस विनंती आहे की, आपण याकडे वैयक्तिक लक्ष देऊन सदरच्या समस्यांची तात्काळ सोडवणूक करावी. 

Post a Comment