नेरले वि.का. सोसायटीच्या विविध कागदपत्रांची दि. 24/2/2023 तसेच 21/4/2023 रोजी, नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी सहाय्यक निबंधक करमाळा व सचिव यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. मागणी केल्याप्रमाणे काही कागदपत्रे दिली गेली, परंतु राहिलेली कागदपत्रे आज पर्यंत दिलेली नाहीत. कागदपत्रे न देण्यामागे सोसायटीच्या वतीने विविध कारणे सांगत, गोपनीयता राखण्यासाठी कागदपत्रे तुम्हाला देऊ शकत नाही. असे साधकबाधक कारणे दिली जातात. तरी सहकारी सोसायटीचा सभासद हा मालक असतो. सहकारी सोसायटीच्या सर्व वस्तू, कागदपत्रे, मालमत्ता याच्यावर सभासदांचा शंभर टक्के हक्क असतो. सचिव हा संस्थेच्या सभासदांचा नोकर आहे. याअनूषंगाने सभासदांनी मागितलेली माहिती देणे सचिवांना महाराष्ट्र सहकारी कायदा अधिनियमानुसार बंधनकारक असताना देखील माहिती दिली जात नाही.
नेरले सोसायटीमध्ये पंधरा ते वीस वर्षांपासून असलेले खरे सभासद वगळले गेले आहेत. व बोगस सभासद धाराशिव जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील गणेश पांडुरंग पाटील, पूजा गणेश पाटील यांची नियमबाह्य नावे सचिवांनी समाविष्ट केलेली आहेत. एवढा अन्याय करून देखील ग्रामस्थ शांत आहेत याचा गैरफायदा सचिव घेत आहेत. अनेक वेळा कागदपत्रांची मागणी करून देखील सचिवांकडून माहिती दिली जात नाही. सचिवांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मागणी केलेली माहिती दि. 30/6/2023 पर्यंत न दिल्यास दि. 5/6/2023 रोजी सहाय्यक निबंध कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे. मागितलेली सर्व माहिती जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार आहे. तरी माझी शारिरीक स्थिती योग्य नाही. त्यामुळे मला गोळ्या सुरु आहेत व विविध उपचार हि सुरु आहेत.
यासंदर्भातील सर्व हॉस्पिटलची कागदपत्रे मी अर्जासोबत जोडली आहेत. व झटका आल्याचे व्हिडिओ सहाय्यक निबंधक करमाळा, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना त्यांच्या मोबाईलवर पाठवत आहे. उपोषणामुळे मला काही त्रास झाल्यास व मला काही धोका झाल्यास यास सर्वस्वी सचिव सदाशिव पांडुरंग पाटील यांच्या पत्नी दैवशाला सदाशिव पाटील, गणेश पांडुरंग पाटील, पूजा गणेश पाटील व संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहतील. माझी ही तक्रार म्हणजे फिर्याद समजून माझ्या जीविताला धोका झाल्यास यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. अशा प्रकारे लेखी निवेदनाद्वारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा, तहसीलदार करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिनांक 21/6/2023 रोजी औदुंबरराजे भोसले यांनी कळविले आहे.

Post a Comment