Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
                सध्या आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा गजर करत विविध साधूसंतांची पालखी व दिंड्या मोठ्या प्रमाणात पंढरपूरकडे पायी वारी करत, ठिक-ठिकाणी मुक्काम करत निघाल्या आहेत. विठ्ठलनामाच्या गजरामध्ये प्रत्येक वारकरी तल्लीन होऊन सातत्य ठेवत पंढरीकडे निघाला आहे. याअनूषंगाने करमाळा तालुक्याच्या मार्गे सुध्दा मोठ्या प्रमाणात विविध जिल्ह्यातून लाखो वारकरी मार्गक्रमण करत असतात. या आषाढी एकादशीनिमित्त करमाळा तालुक्याच्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना, दि. २४ जुन रोजी दोन वारकऱ्यांचा तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. 
           दुर्दैवी मृत्यू झालेल्या वारकऱ्यांमध्ये, यशवंत संभाजी फंड वय- ६० वर्षे, राहणार- बाभलसर, ता. शिरुर, जि. पुणे या वारकऱ्याला भाळवणी ता. करमाळा येथे अचानक तीव्र  ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे, जेऊर येथील खाजगी रुग्णालयात ॲम्ब्यूलन्सव्दारे भरती करण्यात आले होते. याठिकाणी डॉक्टरांनी वारकऱ्यास तपासणी अंती मृत घोषित केले. त्यानंतर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पहाटे ४ वा. फंड यांचे मृत शरीर आणण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल कोळेकर यांनी फंड यांच्या संबंधीचे आवश्यक ती सर्व कार्यवाही करुन, शवविच्छेदन केले.

     यामध्ये दुसरा मृत्यू भागिरथी राधाकिसन पन्हाळे, वय- ५२ वर्षे, राहणार- जवळगे, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर या सुध्दा पायी वारी करत असताना अचानक तीव्र ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे, पन्हाळे यांना उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे ११.४५ वा. तातडीने आणण्यात आले. डॉक्टरांनी पन्हाळे यांना तपासणी अंती मृत घोषीत केले. तरी पन्हाळे यांच्या संबंधीची आवश्यक ती सर्व कार्यवाही करुन, डॉ. डूकरे यांनी शवविच्छेदन केले.

         आधीपासून काही आजार असल्यास वारकऱ्यांनी त्यांच्या शारिरीक तपासण्या करुन घ्याव्यात. व वेळच्या-वेळी गोळ्या-औषधे घेणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यासंबंधी वारकऱ्यांना काही समस्या असतील. तर त्यांनी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील डॉक्टरांकडून तपासणी करुन योग्य तो सल्ला घ्यावा. 

डॉ. राहूल कोळेकर (वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा)

Post a Comment