करमाळा-प्रतिनिधी
आदिनाथ सह. साखर कारखान्यावरील प्रशासक उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा ता. अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील व जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, वास्तविक पहाता जर तुम्हाला प्रशासक नेमायचे होते. तर मकाई सह. साखर कारखान्यावरती नेमायचे होते. प्रशासक आदिनाथ वरतीच का नेमला गेला? करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मंदिर म्हणजे आदिनाथ सह. साखर कारखाना, परंतु या कारखान्याची सत्ता चुकीच्या लोकांकडे गेल्यामुळे आज या कारखान्याची दयनीय अवस्था झाली आहे. अशा स्थितीत हा कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्वावर देण्यासाठी करार झाला होता. परंतु काही राक्षसी राजकीय इच्छा शक्ती असणाऱ्या लोकांनी 'आदिनाथ बचाव'चा नारा दिला व बचाव समिती स्थापन केली. पवारांच्या बद्दल भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या मनात विष पेरण्याचे काम केले. शेतकऱ्यांनी सुध्दा या सर्व नाट्यावर विश्वास ठेवला. लोकवर्गणीतून कारखाना चालू करू म्हणून आव्हान केले, आदिनाथ बाबतीत खोटा पुळका आणला. आणि स्वताःची पोळी भाजून घेण्याचे काम केले. तरी सध्या आदिनाथ कारखान्याची स्थिती म्हणजे 'वाघाच्या सावलीतून काढून लांडग्याच्या घशात घालण्याचा डाव आखला गेला' असल्याप्रमाणे दिसुन येत आहे. तरी कारखान्याच्या बाबतीत प्रशासक आणून त्यांच्या नावाखाली, हा सर्व डाव कुठेतरी यशस्वी करण्याचा प्रयत्न चालू आहे असेच दिसते. आदिनाथ कारखान्या बाबत ह्या सर्व घडामोडी सुरु असताना, तालुक्यातील पुढारी मात्र 'हाताची घडी तोंडावर बोट' या भूमिकेत आहेत. ज्या कर्मवीर गोविंद बापू पाटील यांनी कारखाना उभारणी वेळी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन, जोपर्यंत कारखान्यातुन साखर बाहेर पडत नाही. तोपर्यंत चप्पल न घालण्याची शप्पथ घेतली होती. अशा त्यागी आणि संघर्षशील बापूंच्या विचारांचे आम्ही कुठे तरी वारसदार होण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी प्रशासकाच्या आडून सुरु असलेला डाव आम्ही साध्य होऊन देणार नाही. तरी याबाबत आम्ही लवकरच याचिका दाखल करून, कारखान्याची निवडणूक लावण्याबाबत विनंती करणार आहोत. तरी आदिनाथ कारखान्यामध्ये निवडणूक लढवुन जाण्याची काही व्यक्तींची भूमिका नाही. काही लोकांना फक्त स्वतःला विधानसभेची खुर्ची कशी मिळेल? या तयारीमध्ये असल्याचे दिसुन येत आहे. निवडणुक लढवू इच्छिणाऱ्याना तिकीट कोणी जरी दिले, तरी मत मागायला मात्र शेतकऱ्यांच्याच दारातच जायचे आहे. त्यावेळी शेतकरी मात्र अशा व्यक्तीना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. असे मत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील व जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख यांनी व्यक्त केले आहे.



Post a Comment