Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
            करमाळा तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रियेत स्थानिक कर्मचारी व बालविकास प्रकल्प अधिकारी संगनमताने घोटाळा करत आहेत. शासनाच्या नियमात बसणाऱ्या पात्र उमेदवारांना जाणिवपूर्वक डावलून मनमानी पध्दतीने आर्थिक हित संबंध जोपासत, उमेदवारांचे फाॕर्म भरण्याची अंतिम मुदत संपलेली असताना देखील एक महिना उशिरा कागदपत्रे जमा करून, अपात्र उमेदवारास पात्र कसे करता येईल? याचे सर्व चौकशी अंती शासकीय अधिकारी नियोजन करत असल्याचे दिसुन येत आहे.
              अशाप्रकारे सावळा गोंधळ होत असलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश मांढरे-पाटील यांनी केला आहे. हा प्रकार तालुक्यातील अनेक पात्र उमेदवारांच्या योग्यतेवर अन्याय करणारा आहे. करमाळा तालुक्यामधील एका गावातील पात्र उमेदवाराबाबत असा प्रकार घडला आहे. पात्र असताना देखील त्याला डावलून समोरच्या उमेदवाराकडून एक महिना उशीरा EWS सर्टिफिकेट जोडून घेऊन, त्याचे पात्र यादीत नाव घेतले गेले आहे. हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी उघडकीस आणला आहे. पहिल्यांदा मांढरे- पाटील यांना देखील संबंधीत अधिकाऱ्यांकडून  उडवा उडवीची उत्तरे दिली गेली. परंतु त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फोन लावताच सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. 

            असा प्रकार केवळ आणि केवळ आर्थिक हितसंबंधा शिवाय घडू शकत नाही. अशा प्रकारचा आरोप मांढरे-पाटील यांनी केला आहे. कार्यालयामध्ये काम करणाऱ्या वरिष्ठांपासून ते शिपाई पदापर्यंत काम करणारे स्थानिक कर्मचारी या प्रकरणामध्ये सामिल आहेत. स्थानिकांच्या संबंधाआडून सदरील व्यवहार होत असल्याचे दिसुन येते. त्यामुळे येथे आर्थिक देवाण-घेवाण करणे सोपे जात आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक २९/५/२०२३ रोजी आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेनाद्वारे देण्यात आला आहे.


Post a Comment