करमाळा नगरपरिषदेने शहर स्वच्छ व साफसफाई करण्याचा ठेका विनीत पांडुरंग देवरे वेस्टेक बायोन्हेन्वर ग्रुप ३सुबल्सल अपार्टमेंट नागरमेळा हनुमान वाडी पंचवटी नाशिक या कंपनीस १२,४८,८२८ / रूपये प्रती महीना नगरपालिकेच्या अटी व शर्तीवर मंजुर करण्यात आला होता. परंतु सदर ठेकेदाराने सर्व अटी शर्थींचा भंग केला असुन, या बाबतची योग्य ती चौकशी करून आरोग्य विभागातील शहर स्वच्छता साफसफाई ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी. अशी तक्रार जिल्हाधिकारी सोलापुर यांच्याकडे करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
जिल्हाधिकारी सोलापुर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा नगरपरिषदेकडे आरोग्य विभागातील साफसफाई करणारे ठेकेदारा विषयी माहिती मिळण्याकामी १४ सप्टेंबर २०२२ रोजी लेखी अर्ज दिला होता. परंतु नगरपालिकेने त्याचे उत्तर दिले नाही. पुढे माहिती मिळण्याकामी तीन स्मरण पत्रे दिली. तरी पण माहिती न मिळाल्याने, माहिती अधिकारात माहिती मिळण्याकामी अर्ज केला. परंतु तीस दिवसात माहिती न दिल्यामुळे, मुख्याधिकारी करमाळा यांच्याकडे अपील केले. त्याची सुनावणी आठ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी यांच्या दालनात झाली असुन, माहिती सात दिवसात देणे आवश्यक असताना सदर माहिती मिळण्याकामी पाच वेळा अर्ज द्यावा लागला. आणि सोळा मार्च रोजी माहीती मिळाली पहिला अर्ज केल्यापासुन तब्बल सहा महिन्यानी माहिती मिळाली.
सदर मिळालेल्या माहिती मध्ये ठेकेदाराने स्वच्छता साफसफाईच्या बिलाची नोंद आवक रजिस्टर मध्ये केलेली दिसत नाही. सदर ठेकेदाराने बारा मार्च पासुन कोणती ही पुर्व सुचना न देता पंधरा दिवस काम बंद केले होते. सदर ठेकेदाराने नगरपालिकेस करार पत्रात नियम क्रमांक ३९ मध्ये सफाईचे काम अत्यावश्यक सेवेत येत असल्याने काम बंद करण्यात येणार नाही, अश्या पध्दतीने लिहुन दिलेले आहे. एवढ्या वर न थांबता मार्च २०२३ मध्ये दोन दिवस काम बंद ठेवले होते. परंतु मुख्याधिकारी यांनी अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच माजी नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट महिन्यात पंढरपुर येथील अंदाजे साठ कर्मचारी आणून दहा दिवस शहरातील गटारी सफाई करून, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करून दोन खाजगी ट्रॕक्टर ट्रॉली लावून कचरा व गाळाची वाहतुक करुन साफसफाई केली. परंतु याचे हि बील ठेकेदाराला देण्यात आले. सदरचे वाढदिवसानिमित्त केलेली साफसफाईचे फोटो करमाळा येथुन प्रसिद्ध होणारे साप्ताहिक मध्ये छापुन आलेले आहेत. सदर ठेक्या मध्ये करमाळा नगरपरिषदेचे कायम कर्मचारी काम करताना दिसत आहेत. सफाई कामगारांना कुठलीही सुविधा नाही. हँडग्लोज, पायातील बुट, मास्क आदी साहित्य पुरविण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. जंतुनाशक पावडरची फवारणी केलेली दिसुन येत नाही. फिनेल तर नगरपालिका खरेदी करत नसल्याचे समजते. ठेकेदार कामगारांना ३०० ते ४०० रूपये रोज पगार देतो. सुट्टी असली तर पगार दिला जात नाही.अशा अनेक बाबी समोर आल्या असुन, शहरास अश्या वेठीस धरणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी फारुक जमादार यांनी जिल्हाधिकारी सोलापुर यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आली आहे.



Post a Comment