करमाळा-प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जेऊर ते चिखलठाण हा असा रस्ता आहे ज्याचे गेल्या दहा वर्षांपासून कधीही चांगले डांबरीकरण झाले नाही. या भागातील लोकांनी असे काय पाप केले असेल देव जाणो. वर्षातून एकदा नाही तर दोनदा माती, मुरूमाने खड्डे बुजवून रडणारांचे डोळे पुसण्याचे काम केले जाते. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालवणे अवघड झाले आहे. लोकांना मनक्याचे विकार जडले आहेत. या भागातील शेतातील माल घेण्यासाठी व्यापारी रस्त्यामुळे येत नाहीत. कुगाव पासून जेऊर पर्यंत वाहनांना एक तास लागतो. अशा परिस्थितीत सिरियस पेशंटला तातडीच्या उपचारासाठी या रस्त्याने कसे घेऊन जायचे? या परिस्थितीला जबाबदार कोण? या भागातील स्वतः ला मोठे नेते म्हणून घेणारी मंडळी मोठमोठ्या गप्पा मारतात. पण दहा वर्षांत रस्ता होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. केडगावला जाणारा रस्ता तर विचारायलाच नको. या रस्त्याचे मागील दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते. ते कसे केले? त्या बिचाऱ्या कंत्राटदारालाच माहीत. या परिसरातील लोक सोशीक नाही तर लाचार आहेत. त्यांच्यात अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा कंत्राटदाराला जाब विचारण्याची हिंमत नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्याला कोणी साथ देत नाहीत. नेते मंडळी काही बोलत नाहीत, आणि आपल्या नेत्यांना दुखावण्याची ताकद कोणामध्ये नाही. बाहेर गावातील पाहूणे मंडळी या रस्त्यामुळे येथील लोकांना टोमणे मारतात. त्यांना प्रश्न पडतो, रस्ते इतके खराब असताना कोणी कसे काही बोलत नाही? या लोकांना काहीच कसं वाटत नाही?



Post a Comment