Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी 

               अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई निधी देण्यात यावा. अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद करमाळा तालूक्यात झाली असून, सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील सर्व तहसील तथा कृषी मंडल मधील पर्जन्यमान पाहता, काही ठिकाणी कमी-अधिक पाऊस असेल, परंतू जवळपास सर्वदूर पाऊस झाल्याने खरिपाची पिके वाया गेली आहेत. तर काही ठिकाणी पेरणी तथा मागास पेरणीस ही पावसाने उसंत दिली नाही.

            तालूक्यातील केम, उमरड, कोर्टी, अर्जुननगर, सालसे, जेऊर, करमाळा, केत्तुर, पांगरे, पोथरे, जिंती या मंडलमधे शेती पिकांचे नुकसान दिसून येत आहे. उडीद, मका, सोयाबीन, तूर या पिकांचे नुकसान झाले असून खरबूज, कलिंगड, काकडी आदिसह भाजीपाला व फळबागेवर ही अतिवृष्टीमुळे संकट कोसळले आहे. तरी तहसील व कृषी विभागाकडून तातडीने पिक नुकसान पाहणी व कार्यस्थळावर जाऊन पिक पंचनामे केले जावेत. व नुकसान भरपाई अहवाल तयार केला जावा. अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी या निवेदनातून केली आहे.

             तर करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आता सरकारच्या आर्थिक मदतीकडे डोळे लावून बसलेले असून, खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जेऊर मंडल मध्ये तालुक्यातील सर्वाधिक पावसाची नोंद असून, जेऊर व परिसरातील दहा-पंधरा गावातील उभी पिके जळून गेली आहेत. पिके, फळबाग व तरकारी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकुण इतर मंडल मध्ये ही यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याने, करमाळा तालूक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा इतकी गंभीर परिस्थिती आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या निवेदनाद्वारे केलेले पंचनामे व नुकसानभरपाई अहवाल, मागणीस प्रशासनाकडून गतिमानता येऊन प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

Post a Comment