करमाळा-प्रतिनिधी
"करमाळा तालुक्यातील काही भुरटे पत्रकार खोट्या बातम्या देतात अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये" असे वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून दिग्विजय बागल यांनी शिवसेनेच्या करमाळ्यातील शिवसंपर्क अभियानातील जाहिर सभेत केले. तर या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी पत्रकारांबद्दल चुकीचे वक्तव्य करत बोलले कि, "आमच्या कार्यक्रमात सुपारी घेऊन पत्रकार आले आहेत, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन पत्रकार परिषदेला आला आहात" असा प्रश्न काही पत्रकारांना विचारून, पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली. या कार्यक्रमात दिग्विजय बागल व धनंजय डिकोळे या दोघांनीही पत्रकारांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे, आज करमाळा तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या तातडीच्या बैठकीत दिग्विजय बागल यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.
करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पत्रकार नासीर कबीर, अश्पाक सय्यद, शंभूराजे फरतडे, विशाल घोलप, सिद्धार्थ वाघमारे, अशोक मुरूमकर, अण्णा सुपनवर, अण्णा काळे, अलीम शेख, जयंत दळवी, सुनील भोसले, दस्तगीर मुजावर, सचिन जवेरी, प्राध्यापक अशोक नरसाळे, शितलकुमार मोटे, हर्षवर्धन गाडे आदि पत्रकार यावेळेस उपस्थित होते.
नुकतेच बागल गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या संदर्भात काही पत्रकारांनी बातम्या छापल्या होत्या. व राजकीय प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता यावर बोलताना, शिवसेनेच्या मेळाव्यात दिग्विजय बागल म्हणाले की, "काही भुरटे पत्रकार अशा बातम्या देतात, अशा भुरट्या पत्रकारांकडे लक्ष देऊ नका." याचा पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. शिवसंपर्क अभियानासाठी आलेले अनिल कोकीळ यांना पत्रकारांनी शिवसेनेच्या पक्षसंघटन संदर्भात काही प्रश्न विचारले. शिवसेनेला कुर्डूवाडी नगरपालिकेत मते जास्त पडतात, मग विधानसभेला मते का कमी पडतात? गद्दारी कुर्डूवाडी मधून होते का? करमाळ्यातुन होते? संघटनेतील गटबाजीबद्दल काही प्रश्न विचारले. यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ उत्तर देत असताना, धनंजय डिकोळे यांनी थेट संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या समोरच "हे पत्रकार सुपारी घेऊन पत्रकारिता करतात" असा अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली. यावर काही पत्रकार व डिकोळे यांच्यात वाद झाला. यावेळी एका पत्रकाराने प्रतिप्रश्न विचारला यामुळे संतप्त झालेले डिकोळे यांनी अजून अपशब्द वापरले.
आज शिवसेना संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात दिग्विजय बागल व धनंजय डिकोळे दोघे वैफल्यग्रस्त होऊन बोलत होते. यामुळे यांचा निषेध करत असल्याचा ठराव पत्रकार संघाच्या तातडीच्या बैठकीत करण्यात आला आहे.



Post a Comment