करमाळा-प्रतिनिधी
उजनी कलशातील पाण्याने दि. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, शिखर शिंगणापूर येथील श्री शंभु महादेवास जलधारा अभिषेक घालणार असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. सध्या करमाळा तालुक्यात पाटील गटाच्या वतीने उजनी परिषदेचे आयोजन जोरात चालू असुन, यानिमित्त दहा पुनर्वसित गावांमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा सभांपैकी पाच सभा पार पडल्या असुन, प्रत्येक सभेत कार्यक्रमात सुरुवातीला उजनी कलशाचे पुजन संबंधीत गावातील जेष्ठ धरणग्रस्त शेतकऱ्यांनी केले आहे. उर्वरित पाचही सभांमध्ये अशाच पध्दतीने कार्यक्रम पार पडणार आहे. या उजनी कलश पुजनाचा उद्देश आज माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांना स्पष्ट करुन सांगितला. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की दि. ५ जून रोजी उजनी परिषदेची सांगता शेलगाव (वां) ता. करमाळा येथील सभेने होईल. त्यानंतर दुसरे दिवशी दि. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून करमाळा तालूक्यातून हा उजनी कलश घेऊन आम्ही श्री महादेवाचे स्थान असलेल्या श्री शिखर शिंगणापूर येथे जाणार आहोत. यावेळी अकलूज येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या कलशाची पुजा करण्यात येईल.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पुढे समवेत घेऊन त्यांचे हस्ते शिंगणापूर येथील श्री महादेवास जलाभिषेक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पाटील गटाच्या वतीने कृष्णा नदीतील पाणी एका कलशात आणले जाणार असुन, कृष्णा व भीमा या दोन्ही नद्यांच्या एकत्रीत पाण्याने श्री शंभू महादेवास जलाभिषेक होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून प्रस्तावित पश्चीम महाराष्ट्रातील शेतकऱ्याला संपन्न करणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेस लवकरात-लवकर मंजूरी मिळून कार्यान्वित करण्यात यावी, असे साकडे श्री शंभु महादेवास घालण्यात येणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर या जलधारा कार्यक्रमाचे नियोजन चालू असून कृष्णा नदीतून कलश भरुन आणण्यासाठी काही युवकांवर ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तसेच श्री शंभु महादेव जलधारा अभिषेक सोहळ्यासाठी तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील व मोहिते-पाटील गटातील सर्व आजी माजी पदाधिकारी व महत्वाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दि ६ जून रोजी सकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Post a Comment