करमाळा-प्रतिनिधी
माळशिरस येथील पुणे-पंढरपूर रोडवर असलेल्या शासकीय बालगृह मैदानावर शनिवार (दि. 30) रोजी सकाळी १० वाजता जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे पुजन, दर्शन व प्रवचन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता शहरातील मारुती मंदिरापासून भव्य-दिव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. यात प्रथम निशाणधारी पुरुष व महिला, ढोलपथक, कलशधारी महिला, राम पंचायतन सोहळ्याचा भजन मंडळ सिद्धपादुका व प्रतिमा रथ, भक्त मंडळ सहभागी होणार आहेत.
श्रींचे पादुका पूजन ,सामाजिक उपक्रम, गुरुपुजन, आरती, प्रवचन, भक्त दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणुन जगद्गुरुश्रीं च्या शिकवणीनुसार गरीब, गरजु, निराधार अशा कुटुंबाचा चरितार्थ चालावा म्हणून, घरघंटी (पिठाची गिरणी) चे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या भव्य सोहळ्याला सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागातून भाविक भक्त, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्यामुळे, या सोहळ्याची जय्यत तयारी प्रचार-प्रसार गेल्या महिन्यापासून स्व-स्वरूप संप्रदाय सोलापूर जिल्ह्याचे आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक, भक्त, साधक, शिष्य, ज.न.म.प्रवचनकार करत आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा भक्तवर्ग मोठ्या संख्येने असल्यामुळे, कार्यक्रमासाठी भव्य असा मंडप उभारला असून, येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन स्व-स्वरूप संप्रदायाचे जिल्हा निरिक्षक राजेंद्रजी भुयार, सोलापूर जिल्हा सेवाअध्यक्ष शरद मते व सोलापुर जिल्हा सेवासमितीच्या वतीने करण्यात आले आहे.




Post a Comment